महाविकास आघाडीबाबत जे घडलंय तेच आम आदमी पार्टीबाबत घडतंय?; आतापर्यंत आपचे कोणते नेते गेले तुरुंगात?
आपचे आणखी एक आमदार प्रकाश जारवाल यांना महिलेशी गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागलीय. आपचे नेते विजय नायर यांनाही अबकारी नीती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : दिल्लीतील अबकारी धोरणातील घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदीया यांना सीबीआयने अटक केली आहे. रात्री उशिरा सिसोदिया यांना अटक करण्यात आली. त्यामुळे सिसोदिया यांना अख्खी रात्र तुरुंगात काढावी लागली. आज त्यांची वैद्यकीय चाचणी होऊन त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत आपच्या पाच नेत्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना जसं तुरुंगात जावं लागलं तसंच आपच्या नेत्यांना तुरुंगात जावं लागत असल्याने महाराष्ट्रात जे घडलं तेच दिल्लीत घडतंय की काय? अशी चर्चा आता रंगली आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यासह ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना तुरुंगात जावं लागलं. त्या आधी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना तुरुंगात जावं लागलं होतं. सध्या भुजबळ, अनिल देशमुख आणि राऊत जामिनावर बाहेर आहेत. तर मलिक अजूनही तुरुंगात आहे. घोटाळे, मनी लाँड्रिंग आदी कारणामुळे या नेत्यांना तुरुंगाची हवा खावी लागली आहे. तर अनिल परब यांचीही ईडीने चौकशी केली आहे.
राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांच्या घरावरही छापे मारण्यात आले आहेत. पार्थ पवार यांच्या घरी आणि अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरीही धाडी पडल्या. याशिवाय प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, भावना गवळी आदींच्या मागे तपास यंत्रणांचा सिसेमिरा होता. तर खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप केला होता. त्यानंतर हे सर्व नेते शिंदे गटासोबत गेले. शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली अन् या नेत्यांच्या चौकश्याही थांबल्या.
दिल्लीत काय घडतंय?
जे महाराष्ट्रात महाविकास आघाडीबाबत घडलं. तेच आता दिल्लीतही घडताना दिसत आहे. अवघ्या दहा वर्षात आम आदमी पार्टीने देशभर संघटनेचा विस्तार केला. दिल्लीत आणि पंजाबमध्ये सत्ता आणली. मुख्यमंत्री बनवला. इतर राज्यातही लक्षणीय मते घेतली. त्यामुळे आप चर्चेत असतानाच आपच्या पाच मंत्र्यांना वेगवेगळ्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आता मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. दहा महिन्यांपूर्वी आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती.
त्याशिवाय माजी मंत्री संदीप कुमार यांना सीडी कांडप्रकरणी तुरुंगात टाकलं होतं. कायद्याची बोगस डिग्री घेतल्याप्रकरणी जितेंद्र तोमर यांना अटक करण्यात आली होती. तर पंजाबच्या भगवंत मान सरकारमधील मंत्री विजय सिंघला यांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. केजरीवाल सरकारमधील मंत्री आसिम अहमद खान यांना बिल्डरकडून सहा लाख रुपये घेताना अटक करण्यात आली. सोमनाथ भारती यांच्यावर तर त्यांच्याच पत्नीने छळवणुकीचा आरोप केला होता. आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना वक्फ बोर्डाच्या संपत्तीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे.
आपचे आणखी एक आमदार प्रकाश जारवाल यांना महिलेशी गैरवर्तवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खावी लागलीय. आपचे नेते विजय नायर यांनाही अबकारी नीती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आपचमे माजी नगरसेवक ताहिर हुसैन यांच्यावर दिल्लीत दंगल भडकवल्याचा आरोप आहे. दिल्लीत दंगल भडकावणे आणि दंगलीचा कट रचल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. दिल्ली महापालिकेतील आपच्या नगरसेविका गीता रावत यांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयच्या अँटी करप्शन ब्रँचने अटक केली होती. भूईमुगाच्या व्यापाऱ्याकडून त्यांना चाल दिली जात होती.