भाजपला किती जागा मिळणार? प्रशांत किशोर यांनी केले भाकीत
देशात पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएला ४०० जागा मिळण्याचे लक्ष्य ठेवले आहे. भाजपला ३७० जागा मिळतील असा दावा भाजपकडून होत असताना राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी भाजप सत्तेत येणार की नाही याबाबत भाकीत केले आहे.
प्रशांत किशोर यांनी निवडणुकीचा अंदाज वर्तवला आहे. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत असा दावा केलाय की केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारबद्दल जनतेमध्ये कोणताही मोठा असंतोष नाही किंवा पर्यायाची कोणतीही जोरदार मागणी नाही. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपला तिसऱ्यांदा सत्तेत आणू शकतात. त्यांनी भाकीत केले की भाजपला 2019 ला 303 जागा मिळाल्या होत्या. तितक्याच जागा किंवा त्याहून अधिक काही जागा भाजपला मिळू शकतात.
प्रशांत किशोर यांचे भाकीत काय
प्रशांत किशोर म्हणाले की, मला वाटते की मोदींच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजप सरकार सत्तेत येऊ शकते. त्यांना गेल्या निवडणुकीत जितक्या जागा मिळाल्या तितक्याच जागा किंवा त्यापेक्षा किंचित चांगली कामगिरी भाजप करू शकेल. आपण मूलभूत गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. सध्याचे सरकार आणि त्यांच्या नेत्याविरुद्ध राग असेल, तर पर्याय काहीही असला तरी लोक त्यांना मत देण्याचा निर्णय घेतील अशी शक्यता आहे.
मोदींविरोधात लाट नाही
प्रशांत किशोर म्हणाले की, मोदींच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ असल्याचे मला दिसलेले नाही. लोकांच्या मनात निराशा, अपूर्ण आकांक्षा असू शकतात, परंतु त्यांच्याबाबत व्यापक राग नाही. एनडीएला 400 जागा मिळतील का याबाबत विचारले असता ते म्हणाले की भाजपने 275 जागा जिंकल्या तर आम्ही सरकार स्थापन करणार नाही असे त्यांचे नेते म्हणणार नाहीत. कारण आम्ही 370 जागा जिंकू असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे त्यांना 272 चा बहुमताचा आकडा मिळतो का ते पाहावे लागेल.
प्रशांत किशोर म्हणाले की, ओडिशा आणि बंगालसारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये भाजपच्या जागा वाढू शकतात. लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा कमबॅक करत असल्याचा दावा त्यांनी केला. प्रशांत किशोर म्हणाले की, मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेत परतताना दिसत आहे.
प्रशांत किशोर यांचा हा अंदाज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या विधानानंतर आला आहे. केजरीवाल म्हणाले होते की. ‘नरेंद्र मोदी सरकार सत्तेतून बाहेर जात आहे आणि इंडिया आघाडी येत आहे. 4 जून रोजी दिल्लीत इंडिया आघाडी सरकार स्थापन होणार आहे.’