मुलांचे धर्मांतर कसे केले? सीमा हैदर हिला 11 कोटींची नोटीस, प्रकरण वाटते तितके सोपे नाही…
सीमा हैदर हिच्यासह पती सचिन आणि एका वकिलाला नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमधून सीमा हैदर हिच्याकडे तब्बल 11 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या नोटीसमध्ये मुलांचा धर्म कसा बदलला अशी विचारणाही करण्यात आलीय.
नवी दिल्ली | 9 मार्च 2024 : पब्जी गेम खेळताना ती पाकिस्तानी महिला प्रेमात पडली. नेपाळमार्गे भारतात आली. प्रियकर सचिन याच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केले. त्यांच्या प्रेमाची देशभर चर्चा झाली. तिच्यावर पाकीस्तानी हेर असल्याचा आरोप झाला. तेव्हापासून सुरु झालेल्या तिच्या अडचणी काही केल्या संपता संपत नाहीत. आताही सीमा हैदर आणखी एका वेगळ्या अडचणीत सापडली आहे. सीमा हैदर हिच्यासह पती सचिन आणि एका वकिलाला नोटीस जारी करण्यात आली आहे. या नोटीसमधून सीमा हैदर हिच्याकडे तब्बल 11 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तसेच, या नोटीसमध्ये मुलांचा धर्म कसा बदलला अशी विचारणाही करण्यात आलीय.
सीमा हैदर हिचा पाकिस्तानमधील पहिला पती गुलाम हैदर याने आपल्या वकिलामार्फत तिला नोटीस पाठविली आहे. हरियाणातील पानिपत येथील वकील मोमीन मलिक यांच्यामार्फत गुलाम हैदर याने सीमा हैदर, तिचा पती आणि मानलेला भाऊ यांना ही नोटीस पाठविली आहे. वकील मोमीन मलिक यांनी सीमा हैदर हिचा भाऊ वकील डॉ. ए. पी. सिंग यांना 5 कोटी तर, सीमा हैदर आणि तिचा भारतीय पती सचिन यांना प्रत्येकी 3 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस पाठविली आहे. या तिघांनीही जाहीर माफी मागावी आणि दंडाची रक्कम महिनाभरात जमा करावी, अन्यथा तिघांवरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
गुलाम हैदर यांचे वकील मोमीन मलिक यांनी या नोटीसमध्ये त्यांच्या अल्पवयीन मुलांचा धर्म कसा बदलला, अशी विचारणाही केली आहे. कायद्यानुसार जर एखाद्या मुलाचा धर्म बदलायचा असेल तर त्याला त्याची माहिती द्यावी लागते. यामध्ये मुलांच्या वडिलांचा सल्ला खूप महत्त्वाचा आहे. ही प्रक्रिया का पाळली गेली नाही? मुलांचा धर्म बदलताना वडिलांना का विचारले नाही अशी विचारणाही या नोटीसमध्ये करण्यात आली आहे.
सीमा हैदर ही आपल्या चार मुलांसह भारतात आली होती. सीमा हैदर हिने सचिन याच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केले. त्यानंतर तिने आपल्या मुलांचेही धर्मांतर केले. हे धर्मांतर चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे. यासाठी एक तर महिनाभरात माफी मागा अन्यथा सीमा, तिचा पती सचिन आणि वकील यांनी 11 कोटी रुपये द्यावेत असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.
सीमा हैदर हिचा भारतीय पती सचिन याला पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये सचिन याने सीमा हैदर हिला आमिष दाखवून भारतात बोलावले. तसेच, सीमा हैदरने पती गुलाब हैदर यांच्याशी घटस्फोट न घेता सचिनसोबत दुसरे लग्न केले आहे. याला कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे हे लग्न अवैध आहे असेही या नोटीसमध्ये म्हटले आहे.
या प्रकरणी वरिष्ठ वकील रुद्र विक्रम सिंह यांनी या नोटीसला सीमा हैदर, पती सचिन आणि वकील यांना उत्तर द्यावे लागेल असे स्पष्ट केले. ज्यांच्या विरोधात नोटीस पाठवली आहे त्यांनी नोटीसच्या अटींनुसार उत्तर दिले किंवा माफी मागितली तर हे प्रकरण संपेल. अन्यथा, नोटीसला दिलेल्या मुदतीत उत्तर न दिल्यास नोटीस पाठवणारी व्यक्ती विहित मुदतीनंतर न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करू शकते अशी माहिती दिली.