BBC IT Raids : BBCच्या कार्यालयात रात्रभर झाडाझडती, 21 तासात काय घडलं?; ते 4 किवर्ड काय आहेत?
आयकर विभागाच्या धाडीनंतर बीबीसीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत आहोत. आम्ही आयटी टीमला संपूर्ण सहकार्य करत आहोत. लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा आहे.
नवी दिल्ली: बीबीसीच्या मुंबई आणि दिल्लीतील कार्यालयात आयकर विभागाने धाड मारली आहे. आंतरराष्ट्रीय टॅक्समध्ये हेराफेरी केल्याच्या आरोपावरून ही धाड मारली आहे. गेल्या 21 तासांपासून छापे मारण्यात आले आहेत. आयकर विभागाची ही झाडाझडती रात्रभरापासून सुरू आहे. अजूनही आयकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या कार्यालयात ठाण मांडून आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधकांनी या कारवाईचा निषेध केला आहे. तर भाजपने ही कारवाई संवैधानिक असल्याचा दावा केला आहे.
आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ऑफिसमधील कर्मचाऱ्यांचे फोन जप्त केले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून तात्काळ घरी जाण्यास कालच बजावलं होतं. गेल्या 21 तासांपासून बीबीसीच्या दिल्ली, मुंबईतील कार्यालयात सर्चिंग सुरू आहे.
सेवा देण्यास कटिबद्ध
आयकर विभागाच्या धाडीनंतर बीबीसीने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांसोबत आहोत. आम्ही आयटी टीमला संपूर्ण सहकार्य करत आहोत. लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा आहे. आमचं आऊटपूट आणि पत्रकारितेशी संबंधित रोजचं काम नियमितपणे सुरू राहणार आहे. आम्ही आमच्या वाचकांना सेवा देण्याबाबत कटिबद्ध आहोत, असं बीबीसीने म्हटलं आहे.
शाब्दिक चकमक
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल आयकर विभागाचे अधिकारी बीबीसीच्या दिल्लीच्या कार्यालयात छापे मारण्यासाठी पोहोचले. तेव्हा बीबीसी दिल्लीचे संपादक आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. बीबीसी कार्यालयातील सर्व सिस्टिमच्या चौकशीवरून ही चकमक उडाल्याचं सांगितलं जातं.
चार किवर्ड
त्यानंतर आयटी अधिकाऱ्यांनी ऑफिस कर्मचाऱ्यांच्या संगणकात ‘शेल कंपनी’, ‘फंड ट्रान्स्फर’, ‘परदेशी ट्रान्स्फर’सहीत सिस्टिमवर चार किवर्ड शोधले. संपादकीय कंटेंटचा अॅक्सेस देणार नसल्याचं संपादकांनी बीबीसी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.
प्रेसच्या स्वातंत्र्याचं समर्थन
भारतात बीबीसीच्या कार्यालयावर छापे पडल्यानंतर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. भारतीय आयकर अधिकाऱ्यांनी दिल्लीतील बीबीसीच्या कार्यालयावर छापे मारल्याचं आम्हाला माहीत आहे. आम्ही व्यापक अर्थाने जगभरातील प्रेसच्या स्वातंत्र्याचं समर्थन करत आहोत, असं नेड प्राइस यांनी म्हटलं आहे.