तहव्वूर राणाच्या आवाजाचे नमूने घेतले जात आहे, काय आहे एनआयएची योजना ?
तहव्वूर राणा याला गुरुवारी १० एप्रिल रोजी अमेरिकेतून भारत आणले आहे. मूळचा पाकिस्तानी आणि कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारलेला राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या तुरुंगात बंद होता.

26/11 मुंबईच्या हल्ल्यातील प्रमुख मास्टरमाईंडपैकी एक असलेल्या अतिरेकी तहव्वुर राणा याला अमेरिकेतून प्रत्यार्पणाद्वारे भारतात आणले आहे. तहव्वूर राणा याची दिल्लीतील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ( एनआयए ) मुख्यालयात चौकशी केली जात आहे. राणा याचा एनआयए कोठडीतील चौथा दिवस आहे. एनआयए त्याचे माफिया डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी काय कनेक्शन आहे याचा तपास करीत आहे. दरम्यान, त्याने कुराणसह तीन वस्तू कोठडीत मागितल्या होत्या असे सूत्रांनी सांगितले आहे.
एनआयए दहशतवादी तहव्वूर राणा याचे फोनवरील संभाषणाचे रेकॉर्ड शोधून काढत आहे. हे संभाषण बहुतांश आणखी एक मास्टरमाईंड डेव्हीड कोलमन हेडली याच्याशी झालेले आहे. केंद्रीय तपास अधिकाऱ्यांना संशय आहे की या संभाषणात माफिया डॉन दाऊद इब्राहिम याचा उल्लेख आलेला असावा.
एनआयएला दाट संशय आहे की मुंबई हल्लाची योजना साल २००५ रोजी बनविली होती. राणा देखील देशाची आर्थिक राजधानी मुंबईवरील या अमानूष हल्ल्याच्या घातक योजनेतील एक हिस्सा आहे असा एनआयएचा दावा आहे. हेडलीशी झालेल्या राणाच्या संभाषणाचा शोध घेतला जात आहे. एनआयएला मुंबईवरील हल्ल्याच्या योजनेमागे आणखी कोण-कोण होते त्यांची कुंडली शोधायची आहे.




चौकशीत दुबईच्या व्यक्तीचे नाव
राणाची चौकशी केली असता तपास अधिकाऱ्यांना आधीच एक नाव समजले आहे. तपासात दुबईच्या एका व्यक्तीचे नाव आले आहे. हेडली याच्या सल्ल्याने त्याने राणा याची भेट घेतली होती. या व्यक्तीला मुंबईच्या हल्ल्या संदर्भात सर्व माहीती होती असा संशय तपासअधिकाऱ्यांना आहे. दाऊद किंवा त्याची डी कंपनी यांच्याशी देखील त्याचे संबंध असण्याची शक्यता आहे. त्याच दिशेने तपास सुरु आहे.
आवाजाचे नमून्यांचा तपास
एनआयएचा आधीपासूनच दावा आहे की राणा याचे संबंध अतिरेकी संघटना लष्कर-ए-तैयब्बा यांच्याशी आहेत. राणा पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएएसच्या संपर्कात होता काय ? याचाही शोध घेतला जात आहे. तपास सुरळीत होण्यासाठी राणा याच्या आवाजाचे नमूने घेतले जात आहेत. ते परीक्षणासाठी पाठवले जात आहेत. एनआयए राणा याच्या आवाजाचे नमून हेडलीशी झालेल्या संभाषणाशी जुळतात का याचा तपास केला जात आहे.
भारतात अनेक शहरात हल्ल्याची योजना
राणा आणि त्याची पत्नी मुंबईवरील हल्ल्याच्या काही दिवस आधी भारतात आली होती. त्यांनी अनेक ठिकाणांना भेट दिली होती. राणा याची चौकशी याच साठी केली जात आहे की आणखीन कुठे कुठे हल्ले ते करणार होते. एनआयएने कोर्टात सांगितले की राणाने भारतातील अनेक शहरात हल्ल्याची योजना आखली होती. मूळचा पाकिस्थानी आणि कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारलेला राणा अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या तुरुंगात बंद होता. त्याला गुरुवारी भारत आणले आहे. एनआयए कोर्टाने त्याला १८ दिवसाच्या कोठडी सुनावली आहे. राणा याला दिल्लीच्या सीजीओ कॉम्प्लेक्स येथील एनआयएच्या कार्यालयात कडेकोठ बंदोबस्तात ठेवले आहे. त्याने अधिकाऱ्यांकडे केवळ तीन वस्तू मागितल्या आहेत एक कागद, पेन आणि कुराण !