MNS-BJP | पडद्यामागे काय घडतय? लोकसभेला ठाकरे घराण्यातील उमेदवार देण्याची मनसेची रणनिती का?
MNS-BJP | महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सहभागी होणार का? राज ठाकरे दिल्लीत आहेत. आज त्यांची चर्चा यशस्वी होणार का? मनसेला लोकसभा, विधानसभेला किती जागा मिळू शकतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज मिळतील. महाराष्ट्राच्या राजकारणात मनसे महायुतीसोबत गेल्यास ती एक मोठी राजकीय घडामोड ठरणार आहे.
नवी दिल्ली (संदीप राजगोळकर) : महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दोन-तीन वर्षात बरच काही घडलय. पुलाखालून बरच पाणी वाहून गेलय. नवीन युत्या-आघाड्या आकाराला आल्या. आता आणखी एक नवीन युती आकाराला येऊ शकते. दिल्लीत कालपासून हालचालींना वेग आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये सहभागी करुन घेण्यासाठी घडामोडी सुरु झाल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुत्र अमित ठाकरेसह स्वत: दिल्लीमध्ये आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांची आज बैठक होईल अशी चर्चा आहे. मनसे महायुतीमध्ये आल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा मिळणार? याची उत्सुक्ता आहे. कारण महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे. पण त्यांच्यातच अजून जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाहीय. त्यामुळे मनसेच्या वाट्याला किती जागा येणार हा प्रश्न आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईची एक जागा मिळू शकते. पण राज ठाकरे यांच्या भाजपासोबतच्या वाटाघाटी या दूरदृष्टीच्या आहेत. आणखी सात ते आठ महिन्यांनी होणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा मनसेचा प्रयत्न असेल. मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार, हे अजून अधिकृतपणे जाहीर झालेलं नाही. पण सध्याच्या राजकीय घडामोडी तशाच आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणाची गरज लक्षात घेता, मनसे आणि महायुती दोघांना परस्परांची साथ हवी आहे. मनसेच सभागृहातील संख्याबळ नगण्य आहे. पण राज ठाकरे यांचा आवाज जनमानसाची पकड घेऊ शकतो. त्याचा महायुतीला अन्य उमेदवारांच्या प्रचारासाठी फायदा होईल तर बदल्यात मनसेला अन्य पक्षांची मत मिळणार, त्यामुळे त्यांच्या उमेदवारांची निवडून येण्याची शक्यता वाढेल.
एक-दोन दिवसात मिळेल उत्तर
आता बातमी अशी आहे की, मनसेकडून लोकसभेसाठी ठाकरे घराण्यातील उमेदवार दिला जाऊ शकतो. अमित ठाकरे लोकसभा निवडणूक लढवू शकतात. मनसे अध्यक्ष राज ठाकरे एनडीएत सहभागी झाल्यानंतर अमित ठाकरे संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी सूत्रांची माहिती आहे. मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार का? मनसेला लोकसभा निवडणुकीत किती जागा मिळणार? मनसे-भाजपा युती कुठल्या आधारावर होणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर एक-दोन दिवसात मिळतील.