आमच्या शत्रूला आश्रय दिला तर… शेख हसीना यांचे प्रतिस्पर्धी भारतावर भडकले
पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडून भारतात आश्रय घेतला आहे. त्यांना भारताने सुरक्षित ठेवले आहे. त्यामुळे भारतावर बांगलादेशमधील विरोधी पक्ष टीका करत आहे. भारताने एका पक्षाचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण देशाचा विचार करावा असं विरोधी पक्षाने म्हटले आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना सध्या भारताने आश्रय दिला आहे. भारताच्या या निर्णयावर बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने (बीएनपी) मात्र नाराजी व्यक्त केली आहे. आंदोलन हिंसक झाल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी त्यांनी देश सोडून जाण्याचा सल्ला लष्कर प्रमुखांनी दिला होता. त्या जायला तयार नव्हत्या. पण जर त्यांनी देश सोडला नाही तर आंदोलन त्यांना जीवे मारतील असं सांगितल्यानंतर त्यांनी देश सोडल्याचं त्यांच्या मुलाने म्हटलं आहे. पण यावरुन त्यांचे विरोधक आक्रमत झाले आहेत. शेख हसीना यांना भारतात ज्या प्रकारे होस्ट केले गेले ती चिंतेची बाब असल्याचे खालिदा झिया यांच्या बीएनपीने शुक्रवारी म्हटले आहे. हसीना पुन्हा सत्तेत यावी अशी भारताची इच्छा आहे. त्यासाठी त्यांना पाठिंबा देत आहे, हे योग्य नाही, असे पक्षाने म्हटले आहे. बांगलादेशच्या राजकारणात खालिदा झिया आणि शेख हसीना या एकमेकांच्या प्रमुख प्रतिस्पर्धी आहेत.
भारतावर नाराजी
बीएनपीचे नेते गेश्वर रॉय यांनी म्हटले की, आमचा पक्ष बांगलादेश आणि भारत यांच्यातील परस्पर सहकार्याचे समर्थन करतो, पण जेव्हा आमच्या शत्रूला (शेख हसीना) तुम्ही मदत करता तेव्हा परस्पर संबंधांचा आदर करणे कठीण आहे. एका पक्षाला प्रोत्साहन द्यायचे की संपूर्ण देशाला हे भारताने ठरवावे. भारत आणि बांगलादेशच्या जनतेला एकमेकांशी काहीही अडचण नाहीये, पण भारत संपूर्ण देशाऐवजी एका पक्षाचा आणि नेत्याचा प्रचार का करत आहे. असं ही त्यांनी म्हटले आहे.
अंतरिम सरकार स्थापन
शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर संसद बरखास्त करण्यात आली. त्यानंतर आता बांगलादेशमध्ये नवीन अंतरिम सरकार स्थापन करण्यात आले. ज्याचे प्रमुख नोबेल पारितोषिक विजेते मुहम्मद युनूस यांना बनवण्यात आले आहे. लष्कराच्या पाठिंब्याने हे अंतरिम सरकार काम करणार आहे. बांगलादेशात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रपती भवनात युनूस यांना राष्ट्रपती मुहम्मद शहाबुद्दीन यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. युनूस यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे राजदूतही उपस्थित होते. मोहम्मद युनूस यांनी अंतरिम सरकारचे प्रमुख म्हणून शपथ घेतल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. बांगलादेशमधील परिस्थिती लवकरच सामान्य होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, दोन्ही देशांतील लोकांच्या समान आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारत बांगलादेशसोबत काम करण्यास कटिबद्ध आहे.
युनूस खान यांच्याकडे मोठी जबाबदारी
प्रोफेसर युनूस म्हणाले की, अंतरिम सरकारचे प्राधान्य देशातील जीवन सामान्य करणे आणि नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे हे आहे. युनूस यांच्यावर देशात नव्याने निवडणुका घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी युनूस यांच्या नावाची शिफारस केली होती. युनूस त्यांच्या उपचारासाठी फ्रान्समध्ये होते. लष्करप्रमुखांनी त्यांना फोन केल्यानंतर ते गुरुवारीच पॅरिसहून ढाका येथे परतले आणि त्यांनी शपथ घेतली.