PM Modi Speech : लाल किल्ल्यावरील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना नमन करण्यापासून अगदी देशाच्या भविष्यातील योजनांपर्यंत भाष्य केलं.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना नमन करण्यापासून अगदी देशाच्या भविष्यातील योजनांपर्यंत भाष्य केलं.
लाल किल्ल्यावरील पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे
1. पंतप्रधान मोदींकडून महात्मा गांधींपासून नेहरुंपर्यंत सर्व स्वातंत्र्यवीरांना अभिवादन
पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशाच्या संरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना, स्वातंत्र्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांना नमन. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना देश आठवत आहे. या सर्वांना वंदन करतो.”
2. “देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम, म्हणूनच हा दिवस यापुढे साजरा करणार”
देशाच्या फाळणीने देशाला मोठी जखम केली. म्हणूनच हा फाळणीचा दिवस यापुढे दरवर्षी साजरा केला जाईल. या दिवशी फाळणीमुळे ज्यांचा मृत्यू झाला त्यांची आठवण केली जाईल, असंही मोदी म्हणाले.
3. भारताने कोरोना लस तयार केली नसती तर काय झालं असतं? : मोदी
भारताने कोरोना लस तयार केली नसती तर काय झालं असतं? मात्र, आज देशात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरू आहे. हे खरं आहे की आपण अनेक लोकांचा जीव वाचवू शकलो नाही. त्यामुळे हा काळा पाठ थोपटून घेण्याचा नाही. या काळात अनेक लहान मुलांच्या डोक्यावर हात फिरवणारे कोरोनाचा बळी ठरलेत, असंही मोदींनी नमूद केलं.
4. “100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, प्रत्येकाला हक्काचं घर असावं”
नरेंद्र मोदी म्हणाले, “उज्वला योजनेपासून आयुष्मानपर्यंत योजनांची ताकद सर्वसामान्यांना माहिती आहे. मात्र, इतक्यावरच थांबायचं नाहीये. 100 टक्के गावांमध्ये रस्ते असावेत, सर्वांकडे बँक खाते असावेत, सर्वांकडे आयुष्मान कार्ड असावे, घरकुल योजनेतून प्रत्येक हक्काच्या व्यक्तीला घर द्यायचं आहे.”
5. “देशातील 100 टक्के घरांमध्ये वीज आणि शौचालय”
“देशातील 100 टक्के घरांमध्ये वीज पोहचली, 100 टक्के घरांमध्ये शौचालय निर्मितीसाठी प्रयत्न केले. आता देशातील प्रत्येक घरात पाण्याचा नळ देण्यासाठी काम करणार आहे,” असंही मोदी म्हणाले.
6. “आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर”
पंतप्रधान मोदी म्हणाले, “देशातील प्रत्येकापर्यंत चांगल्या आरोग्याची व्यवस्था पोहचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. यासाठी आयुष्मान भारत योजनेत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पोहचवल्या जात आहेत, नागरिकांना स्वस्त औषधं उपलब्ध करुन दिले जात आहे. आता ब्लॉक स्तरावर आधुनिक रुग्णालयं उभे करण्यावर भर दिला जात आहे. पुढील काळात रुग्णालयांकडे स्वतःचे ऑक्सिजन प्लँट असतील.”
7. “लवकरच ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वे मार्गाने जोडणार”
लवकरच ईशान्य भारतातील सर्व राज्यांच्या सर्व राजधान्यांना रेल्वे मार्गाने जोडले जाईल. या राज्यांना देशाच्या विकासाचा भाग बनवावं लागेल. हे काम देशाच्या अमृतमहोत्सवाआधी पूर्ण करावं लागेल.
8. जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील : मोदी
जम्मू काश्मीरमध्ये डिलिमिटेशन बोर्डाचं गठन झालंय, लवकरच तिथं विधानसभा निवडणुका होतील.
9. “देशात भांडवलशाही आणि समाजवादाची खूप चर्चा, पण सहकारवादही महत्त्वाचा”
“देशात भांडवलशाही आणि समाजवादाची खूप चर्चा होते. पण देशात सहकारवादाचीही गरज आहे. यामुळे देशातील जनता विकासाचा भाग बनावा म्हणून सहकार क्षेत्र महत्त्वाचं आहे. सहकार हे एक संस्कार, प्रेरणा आणि सोबत चालण्याची वृत्ती आहे. म्हणूनच स्वतंत्र सहकार मंत्रालय बनवण्यात आलं.”
10. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती : मोदी
मोदी म्हणाले, “वाढत्या लोकसंख्यामुळे कुटुंबात विभागणी होऊन गावांमध्ये शेतकऱ्यांकडील जमिनीचं प्रमाण कमी होतंय. हे मोठं आव्हान आहे. सध्या देशात 80 टक्के शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपेक्षा कमी शेती आहे. या अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे जितकं लक्ष द्यायला हवं होतं तितकं आधी दिलं गेलं नाही. आत्ता या शेतकऱ्यांवर लक्ष दिलं जातंय. ब्लॉक लेव्हलवर विअर हाऊस तयार करण्यावर भर देणार आहे.”
11. देशात 75 वंदे भारत रेल्वे देशातील विविध भागांना जोडतील : मोदी
देश 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना देशभरात 75 ‘वंदे भारत रेल्वे’ देशातील विविध भागांना जोडतील : मोदी
12. विविध क्षेत्रात अडथळे ठरणारे 15000 निर्बंध आम्ही संपवले : मोदी
200 वर्षांपासून नकाशाचा कायदा अस्तित्वात होता. मॅपिंग असो, स्पेस असो, माहिती तंत्रज्ञान असो या सर्व क्षेत्रातील 15000 निर्बंध आम्ही संपवले आहेत.
13. देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुलींनाही प्रवेश देणार : मोदी
मुलींनाही समान संधी मिळाली पाहिजे. मुली कोणत्याच क्षेत्रात कमी नाही. त्यामुळे आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये आता मुलींनाही प्रवेश देणार आहे, अशी घोषणा नरेंद्र मोदींनी केली.
14. भारतीय स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणार : मोदी
भारतीय स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षापर्यंत देशाला ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. तसेच या दशकापर्यंत 450 गिगावॅट अपारंपारिक उर्जा निर्मितीचं लक्ष्य ठेवलं आहे. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशनची घोषणा, भारताची ऊर्जा क्षेत्रातील मोठी प्रगती, जगात स्वच्छ उर्जासाठी भारताला ओळखलं जाईल, असंही मोदींनी सांगितलं.
15. देशाचं 25 वर्षांनंतरचं साध्य आजचा संकल्प असेल : मोदी
25 वर्षांनंतर जे कुणी पंतप्रधान असतील ते या ठिकाणावरुन देशाने काय साध्य केलं हे सांगताना जे सांगतील ते आजचा मी सांगत असलेला संकल्प असेल : मोदी
हेही वाचा :
PM Modi Speech : जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील : मोदी
PM Modi Speech: देशातील दळवळण आणि प्रवास वेगवान करण्यासाठी मोदींचा मास्टरप्लॅन, दोन महत्त्वाच्या योजनांची घोषणा
PM Modi speech: ‘सबका साथ, सबका विकास’ आणि आता ‘सबका प्रयास’, पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी घोषणा
व्हिडीओ पाहा :
Important points of PM Modi independence day speech 2021