हिंदू मुलींना शाळेतून मशिदीत नेलं, हिजाब घालून वजू करायला लावलं, गोव्यातील घटना
हिंदू मुलींना मशिदीत का नेलं? हिजाब घालायला का लावला? वूज करण्यासाठी त्यांना का भाग पाडलं? असा हिंदू संघटनांचा सवाल आहे. या विषयावरुन वातावरण तापलं आहे.
पणजी : गोव्यातील एका शाळेत हिंदू मुलींना हिजाब घालून मशिदीत नेण्यात आलं. तिथे त्यांना वजू करायला लावल्याच प्रकरण समोर आलय. SIO म्हणजे स्टुडेंट इस्लामिक ऑर्गनायजेशन ही संघटना यामागे आहे. संबंधित फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर हिंदू संघटनांनी आता यावरुन गदारोळ सुरु केलाय. SIO वर धर्म परिवर्तनाचा कारस्थान रचल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. स्टुडेंट इस्लामिक ऑर्गनायजेशनने हे आरोप फेटाळून लावले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर शालेय शिक्षण विभागाने शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करुन प्रकरणाची चौकशी सुरु केलीय. पोलिसांनी सुद्धा यासंबंधी FIR दाखल करुन प्रकरणाची चौकशी सुरु केलीय. मात्र, तरीही हिंदू संघटनांचा संताप कमी झालेला नाही. हिंदू मुलींना मशिदीत का नेलं? असा प्रश्न या संघटनांनी विचारलाय. त्यांना हिजाब घालायला का लावला? वूज करण्यासाठी त्यांना का भाग पाडलं? असा हिंदू संघटनांचा सवाल आहे.
SIO वर देशविरोधी संघटनांशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आलाय. या कृतीमागे धर्मांतरासाठी मुलींच ब्रेनवॉश करण्याचा उद्देश आहे. मुलींना मशिदीत नेण्याआधी शिक्षण विभाग किंवा शाळा व्यवस्थापनाने त्यांच्या पालकांची परवानगी घेतली नाही तसच या मुलींना सुद्धा विचारलं नाही, असं हिंदू संघटनांनी म्हटलं आहे. SIO च्या सांगण्यावरुन शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलींना तयार केलं व दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनेसाठी त्यांना भाग पाडलं असं आरोप आहे. कधीची घटना आहे?
या विषयावरुन वातावरण तापलं आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने मुख्याध्यापकाला निलंबित करुन शाळा व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण मागितलय. दोन ते तीन दिवसापूर्वीची ही घटना आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांना आता या बद्दल समजलय. विश्व हिंदू परिषदेने वास्को शहरातील शाळेच्या मुख्याध्यापकाविरोधात वास्को पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.