आता मुस्लिम डॉक्टरचीही ‘श्री हरि’ लिहिलेली औषधांची पावती व्हायरल; डॉक्टर म्हणतो, दवा के साथ साथ दुआ…
डॉक्टरांचं काम औषधांची पावती लिहिणं आणि रुग्णांचा आजार बरा करणं हे आहे. रुग्णाला औषधांबरोबरच दुव्याचीही गरज असते. हिंदी ही बोली भाषा आहे.
सागर: मध्यप्रदेशातील सागरमधील एका मुस्लिम डॉक्टरची (doctor) औषधांची पावती (prescriptions) सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. औसफ अली असं या डॉक्टरचं नाव आहे. त्याच्या या औषधाच्या पावतीवर Rxच्या जागी श्री हरि लिहिलेलं आहे. विशेष म्हणजे या डॉक्टरने सर्व औषधांची नावे हिंदीत लिहिली आहेत. त्यामुळे त्याची ही औषधांची पावती सध्या सोशल मीडियावर (social media) प्रचंड व्हायरल होत आहे. औषधांची चिठ्ठी देणं आणि रुग्णाला बरं करणं हे डॉक्टरांचं काम आहे. रुग्णाला औषधांबरोबरच दुव्याचीही गरज असते, असं या डॉक्टरचं म्हणणं आहे.
औसफ अली हे आपल्या औषधांच्या पावत्यांवर श्रीहरि लिहितात.रुग्णाचे नाव, त्याला असलेला आजार आणि औषधांची नावे ते हिंदीत लिहितात. त्यांना औषधांची पावती हिंदीतच लिहायला आवडते. औसफ अली डेंटल सर्जन आहेत आणि ते प्रायव्हेट प्रॅक्टिस करतात.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मध्यप्रदेशात हिंदीतून एमबीबीएसचं शिक्षण सुरू केलं आहे. त्या संदर्भातील एका कार्यक्रमात चौहान यांनी डॉक्टरांना औषधांच्या पावतीवर आरएक्सच्या ऐवजी श्रीहरि लिहिण्याचा सल्ला दिला होता.
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर औसफ अली यांनी हिंदीत लिहियला सुरुवात केली. त्यामुळेच ते औषधांच्या पावतीवर आरएक्सच्या ऐवजी श्रीहरि लिहित आहेत. तसेच रुग्णांचा आजार आणि त्यावरील औषध याची माहितीही हिंदीतच लिहित आहेत. त्यांची ही हिंदीतील औषधांची पावती सध्या तुफान व्हायरल होत आहे. तसेच त्यांचं कौतुकही होत आहे.
औसफ अली यांचं क्लिनिक सागरमध्ये राहगतगड बस स्टँड जवळ आहे. त्यांची पत्नी डेंटल सर्जन आहे. दोघे मिळून सना डेंटल क्लिनिक चालवतात.
डॉक्टरांचं काम औषधांची पावती लिहिणं आणि रुग्णांचा आजार बरा करणं हे आहे. रुग्णाला औषधांबरोबरच दुव्याचीही गरज असते. हिंदी ही बोली भाषा आहे. ही भाषा कोणीही लिहू शकतो आणि वाचू शकतो, असं ते म्हणतात. तसेच हिंदीला प्रोत्साहन मिळालं पाहिजे, असं ते म्हणतात. शिवाय रुग्णही ही औषधांची चिठ्ठी सहज वाचू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.