Road accident | तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला, त्याला लुटलं, व्हि़डिओ बनवले पण कोणी मदतीसाठी नाही आलं पुढे
Road accident | खरच आजच्या समाजात माणूसकी कुठे हरवत चाललीय का? आपण इतके भावनाशुन्य झालोय का, की, एखाद्याचे प्राण जात असतानाही मदत करायची नाही. अशीच मनाला सून्न करुन सोडणारी एक घटना देशाच्या राजधानीत घडली. खरच आपण सर्वांनी विचार करण्याची वेळ आलीय.
नवी दिल्ली : एक माणूस म्हणून अंतर्मुख होऊन विचार करायला भाग पाडणारी एक घटना घडली आहे. एखादा माणूस अडचणीत, संकटात असेल, तर मदतीसाठी हात पुढे करतो. ही माणूसकी आहे. पण सध्या समाजात हीच माणूसकी हरवत चाललीय. राजधानी दिल्लीत अशीच एक माणूस म्हणून आपल्याला विचार करायला भाग पाडणारी घटना घडली आहे. एक 30 वर्षाचा उदयोन्मुख चित्रपट दिग्दर्शक अर्धातास रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. ते ही दक्षिण दिल्लीतील एका वर्दळीच्या रस्त्यावर. तिथून जाणारे वाटसरु, पादचारी यांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला. सेल्फी काढला. काहींनी त्याला लुटलं. पण माणूस म्हणून कोणी मदतीसाठी पुढे आलं नाही. नागरिकांनी त्याच्याबद्दल ही जी भावना शुन्यता दाखवली त्यामुळे या 30 वर्षाच्या मुलाने प्राण गमावले. पियुष पालला वेळेवर उपचार मिळू शकले नाहीत.
पियुष बाईक अपघातात गंभीर जखमी झाला होता. दोन बाईकची टक्कर झाल्याने हा भीषण अपघात घडला. पियुषच्या डोक्याला आणि चेहऱ्याला मार लागला होता. कोणी मदत केली असती, वेळेवर उपचार मिळाले असते, तर कदाचित पियुष पाल आज आपल्यात असता. शनिवारी रात्री 9.45 च्या सुमारास दिल्लीच्या आऊटर रिंग रोडवर हा अपघात घडला. अर्ध्या तासानंतर पंकज जैन आणि अन्य काहीजण तिथे रस्त्यावर काय चाललय म्हणून पाहण्यासाठी थांबले व त्यानंतर हालचाल सुरु झाली. “पियुषच्या शरीरातून बरच रक्त गेलं होतं. तिथे असलेल्या लोकांनी मला सांगितलं की, तो अर्ध्या तासापासून तिथे पडून होता. त्याला उचलण्यासाठी मी दोन ते तीन लोकांची मदत घेतली” असं पंकज जैनने सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
ज्याने कोणी फोन नेला, त्याने एक कॉल उचलला असता, तर….
पियुष पालला ते ऑटोरिक्षामधून जवळच्या क्लिनिकमध्ये घेऊन गेले. पण आवश्यक उपचार तिथे शक्य नव्हते. म्हणून, मग तिथून 4 किमी अंतरावर असलेल्या हॉस्पिटलमध्ये नेलं. वाहतूक कोंडीमुळे अखेर रात्री 11 च्या सुमारास पियुषला वैद्यकीय मदत मिळाली. पण तो पर्यंत उशिर झालेला. पियुष पालचा मृत्यू झाला. “कोणीतरी त्याचा मोबाइल फोन आणि लॅपटॉप उचलून घेऊन गेले. त्याचे आई-वडिल मोबाइलवर फोन करत होते. पण जो फोन घेऊन गेला तो सारखा कॉल कट करत होता. नंतर त्याने मोबाइलन स्विच ऑफ केला. ज्याने कोणी फोन नेला, त्याने एक कॉल उचलून सांगितलं असतं, तर आज चित्र वेगळं असतं” असं पियुषचा मित्र स्वरनेंनदू बोसने सांगितलं.