CM KCR यांचा पक्ष विस्तारावर भर, दिल्लीत पक्षाच्या नवीन चार मजली कार्यालयाचे आज उद्घाटन
मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी सप्टेंबर 2021 मध्ये या इमारतीची पायाभरणी केली होती आणि तिचे बांधकाम सुमारे 20 महिन्यांत पूर्ण झाले. या चार मजली बीआरएस इमारतीत अनेक सुविधा आहेत.
मुंबई : मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव गुरुवारी (4 मे) बसंत विहार येथे बीआरएस इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. केसीआर हे बीआरएसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राजधानीत मध्यवर्ती कार्यालय सुरू झाल्याने पक्षाच्या देशव्यापी विस्ताराला गती मिळणार आहे. यावेळी केसीआर वेदोक्त पद्धतीने पूजन करून कार्यालयाचे उद्घाटन करतील.
दिल्लीत चार मजली बीआरएस इमारत तयार झाली आहे. गतवर्षी या पक्ष कार्यालयाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. मुख्यमंत्री केसीआर यांनी राष्ट्रीय राजधानीत बीआरएस पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला आहे. बसंत विहार येथील कार्यालयात कॉन्फरन्स हॉल आणि इतर अनेक सुविधा असतील.
इमारत बांधकाम मंत्री प्रशांत रेड्डी आणि राज्यसभा खासदार जोगीनापल्ली संतोष कुमार दिल्लीतील या इमारतीचे बांधकाम पूर्ण होण्याशी संबंधित कामाची सतत पाहणी करत आहेत. या इमारतीमुळे बीआरएस पक्षाच्या कामाला गती मिळणार आहे. 11 हजार स्क्वेअर फूट जागेत बीआरएस इमारत बांधली असून त्यात चार मजले आहेत. पहिल्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉल आहे. यासोबतच बीआरएस अध्यक्षांचे कार्यालय देखील असणार आहे.
केसीआर यांचा पक्ष विस्तारावर भर
केसीआर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी एक मजबूत पर्याय तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. 2024 मध्ये मोदी सरकार परत येऊ नये, अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या स्तरावर आघाडी उघडली आहे. सीएम केसीआर महाराष्ट्रात बीआरएसच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहेत, जिथे त्यांनी तीन जाहीर सभा घेतल्या आहेत.
याशिवाय त्यांनी विविध पक्षांच्या स्थानिक नेत्यांचा बीआरएसमध्ये समावेश केला आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यमंत्र्यांनी मुंबई, पुणे, नागपूर आणि औरंगाबादसह महाराष्ट्रातील चार प्रमुख शहरांमध्ये पक्षाची चार कार्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.