भारताने अनेक प्रयत्न करुन ही तेच घडलं जे नको होतं, मालदीवला नक्की बसणार याचा फटका
भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. ते लवकर पूर्वरत होतील असे वाटत नाही. कारण मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी तेच केले जे भारताला नको होते. यासाठी भारताने अनेक प्रयत्न केले. मालदीवला महत्त्व दिले पण कदाचित मालदीवला याचा फटका भविष्यात नक्की बसेल.
India maldive row : मालदीवचे परराष्ट्र मंत्री मुसा जमीर हे भारत दौऱ्यावर आले होते. त्यांनी शनिवारी सांगितले की, मालदीवमधील 76 भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांची जागा आता हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या नागरी कर्मचारी घेणार आहेत. एचएएलने भारताने भेट दिलेल्या हेलिकॉप्टरची निर्मिती केली आहे. मालदीवमध्ये हेलिकॉप्टर आणि डॉर्नियर विमानांचे दोन प्लॅटफॉर्म ऑपरेट करण्यासाठी भारतीय जवान तैनात करण्यात आले होते. पण मालदीवमध्ये चीन समर्थक सरकार सत्तेत आल्याने त्यांनी भारतीय सैनिकांना माघारी बोलवण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर भारताने याबाबत बराच प्रयत्न केला. त्यानंतर मग त्यांच्या जागी नागरी कर्मचारी तैनात करण्याबाबत एकमत झाले.
भारतीय सैनिक परतले
चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी नोव्हेंबरमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर काही तासांतच ही मागणी केली होती. स्थानिक मीडिया रिपोर्ट्समध्ये जमीर यांनी भारताच्या पहिल्या अधिकृत भेटीवरून परतल्यानंतर एका दिवसानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना हनीमधू, काधधू आणि गण येथे तैनात भारतीय सैन्याच्या उपस्थितीचे तपशील दिले आहेत. एका न्यूज पोर्टलने जमीर यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, “26 सैनिकांना 7 मार्च ते 9 मार्च दरम्यान गानमधून माघारी पाठवण्यात आले, तर 7 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान हनीमधु येथून आणखी 25 सैनिकांना माघारी पाठवलेय. मंगळवारी 12 सैनिकांना कधधूतून हटवण्यात आले. 13 सैनिकांची शेवटची तुकडी गुरुवारी कधधूहून परतेल.
जमीर म्हणाले की, भारताने भेटवस्तू दिलेल्या हेलिकॉप्टरची निर्मिती करणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) चे नागरी कर्मचारी भारतीय लष्करी जवानांची जागा घेण्यासाठी आले आहेत. मालदीव सरकारने यापूर्वी सांगितले होते की मालदीवमध्ये 89 भारतीय सैनिक दोन लष्करी हेलिकॉप्टर आणि एक डॉर्नियर विमान चालवत आहेत.
भारत-मालदीव तणाव
भारत आणि मालदीव यांच्यात सध्या तणावाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. ज्यावर भारताने नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. पण त्यानंतर ही मुइज्जू यांच्याकडून भारतविरोधी भूमिका घेण्याचे काम सुरुच होते.