India-maldive Row : मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचे कडक शब्दात प्रत्युत्तर
India-Maldives Row: मालदीवच्या राष्ट्राध्यक्षपदी चीन समर्थक मोहम्मद मुइज्जू विराजमान झाल्यानंतर भारतासोबत त्यांनी संबंध बिघडवले आहे. चीन समर्थक असल्याने त्यांना चीनकडून अधिक मदतीची अपेक्षा आहे. मालदीवर चीनचे सर्वाधिक कर्ज आहे. असं असताना ते भारताच्या विरोधात भूमिका घेत आहेत.
India maldive row : भारत आणि मालदीव या दोन देशांमधील संबंध तणावपूर्ण असताना आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना सुनावले आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध खराब झाले आहे. कारण मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. त्यांना भारतापेक्षा चीनसोबत अधिक संबंध वाढवायचे आहे. तर चीनला देखील मालदीवला भारतापासून लांब करायचे आहे. आता परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मालदीवला प्रत्युत्तर दिले आहे. मुइज्जू यांच्या ‘बिग बुली’च्या वक्तव्यावर एस जयशंकर म्हणाले की, शेजारी देश संकटात असताना, बुली 4.5 अब्ज डॉलर्सची मदत देत नाहीत.
भारताचे मालदीवला उत्तर
जयशंकर यांचे हे विधान मुइज्जू यांच्या विधानावरील प्रतिक्रिया आहे. जे त्यांनी यावर्षी जानेवारीत दिले होते. मुइज्जू यांनी म्हटले होते की, आम्ही एक छोटा देश आहोत पण आमच्यावर कोणालाही अत्याचार करण्याचा परवाना आम्ही देत नाही. त्यांच्या या वक्तव्यावर भारताने देखील आता कडक शब्दात सुनावले आहे.
एका कार्यक्रमात बोलताना एस जयशंकर यांनी सांगितले की, संकटात असताना भारत नेहमीच शेजारील देशांना मदत करत आला आहे. भारतीय उपखंडात भारताकडे ‘गुंड’ म्हणून पाहिले जाते का? या प्रश्नावर बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली.
भारताने केलेल्या मदतीची करुन दिली आठवण
एस जयशंकर पुढे म्हणाले की, जेव्हा तुम्ही भारताला एक गुंड म्हणून पाहता, तेव्हा तुम्हाला हे समजले पाहिजे की ‘बिग बुली’ हा संकटात सापडलेल्या शेजारी देशांना 4.5 अब्ज डॉलर्सची मदत देत नाहीत. ‘बिग बुली’ इतर देशांना कोरोनाच्या काळात लस पुरवत नाहीत. युद्ध किंवा संकटात सापडलेल्या देशांच्या अन्नाची गरज पूर्ण करत नाही.
ते म्हणाले की, आज भारत आणि इतर शेजारी राष्ट्रांमध्ये काय बदल झाले आहेत हे पाहावे लागेल. बांगलादेश आणि नेपाळसोबतचे भारताचे व्यापारी संबंध सुधारलेत. गेल्या काही वर्षांत नेपाळ, श्रीलंका, भूतान आणि बांगलादेशसोबत गुंतवणूक आणि व्यापार वाढला आहे. यामध्ये मालदीवचाही समावेश आहे.
चीन दौऱ्यानंतर भारताशी पंगा
मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी जानेवारीत चीन दौरा केला होता. या दौऱ्यावरून परत येताच त्यांनी आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना कोणालाच नाही, असे म्हटले होते. आम्ही एक छोटा देश असू शकतो पण आमच्यावर अत्याचार करण्याचा परवाना कोणालाही देत नाही. मुइज्जू यांनी थेट कोणाचेही नाव घेतले नव्हते. पण त्यांचा इशारा हा भारताकडे होता.
चीन समर्थक मुइज्जू यांनी चीन दौऱ्यात राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली होती. मालदीव सरकारच्या तीन मंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल निलंबित करण्यात आले होते. या मुद्द्यावरून भारत आणि मालदीवमध्ये वाद वाढला होता.