भारताचा मालदीवला झटका, दोन शेजारील देशांमध्ये लॉन्च केली ही सेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला झटका देण्यासाठी आता डिजीटल सिस्टमचा आधार घेतला आहे. भारताने मालदीवच्या दोन शेजारील राष्ट्रांमध्ये यूपीआय सर्विस लॉन्च केली आहे. यामुळे या दोन देशांमध्ये भारतीय पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मालदीवला मात्र झटका लागणार आहे.
UPI service launch : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टवर मालदीवच्या मंंत्र्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे मालदीव आणि भारत यांच्यातील तणाव वाढला आहे. मालदीवमध्ये सत्तेत आलेले नवे राष्ट्राध्यक्ष हे चीन समर्थक मानले जातात. त्यामुळे ते सतत भारतविरोधी वक्तव्य करत आहेत. दुसरीकडे चीन त्याचा गैरफायदा घेण्याच्या तयारीत आहे. मालदीवला कर्ज देत त्यांना तो गुलाम बनवण्याच्या हेतूने मदत करत आहे. मालदीवच्या अर्थव्यवस्थेपेक्षा जास्त कर्ज मालदीववर आहे. दुसरीकडे ते चीनकडून आणखी कर्ज घेत आहेत. याबाबत आयएमएफने आधीच त्यांना इशारा देखील दिला आहे.
दुसरीकडे पीएम मोदी यांनी आणखी दोन देशांमध्ये UPI पेमेंट सेवा लॉन्च केली आहे. पीएम मोदी नेहमीच याचा प्रचार करताना दिसत आहेत. याचाच परिणाम म्हणजे ऑनलाइन पेमेंट सिस्टम UPI भारतातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध होत आहे. चीन आणि पाकिस्तान सारखे देश UPI पेमेंट सिस्टमच्या ताकदीबद्दल आधीच चिंतेत आहेत. आता चीन आणि मालदीव यांच्यातील वाढत्या जवळीकीवर तोडगा काढण्यासाठी UPI हे एक प्रभावी पाऊल ठरत आहे.
श्रीलंका आणि मॉरिशस ही नवीन पर्यटन स्थळे
मालदीवला चीनकडे झुकणे महागात पडणार आहे. मालदीवला वेढा डिजिटल पद्धतीने घालण्यात आला आहे. मालदीव हे भारतीयांसाठी एक मोठे पर्यटन स्थळ होते. जिथे दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत होते. पण आता भारतीयांची संख्या कमी होताना दिसत आहे. भारतीय पर्यटक श्रीलंका आणि मॉरिशससह लक्षद्वीवाला जाण्याचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळेच सरकारने या देशांमध्ये ऑनलाइन पेमेंट सेवा UPI सुरू केली आहे. पीएम मोदींनी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये यूपीआय सेवा सुरू केली आहे.
मालदीवला बसणार मोठा झटका
UPI सेवा भारत, मॉरिशस आणि श्रीलंका यांच्यातील पर्यटन वाढवण्यास मदत करेल, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते म्हणाले की, ज्या देशांमध्ये UPI सेवा उपलब्ध आहे, त्या देशांना भेट देण्यात पर्यटक अधिक रस दाखवतील अशी अपेक्षा आहे. पीएम मोदींच्या या वक्तव्यामुळे पर्यटक मालदीवमधून श्रीलंका आणि मॉरिशसला जाऊ शकतात. यामुळे मालदीवचे आर्थिक नुकसान होऊ शकते. चीनच्या मालदीव योजनेला झटका बसू शकतो, कारण चीन सतत मालदीवला आपल्या गोटात आणण्याचा प्रयत्न करत आहे.
डिजिटल पेमेंटमध्ये भारत आघाडीवर
जर आपण डिजिटल पेमेंटबद्दल बोललो तर या यादीत भारत अव्वल स्थानावर आहे. अलीकडेच, फ्रान्ससह एकूण 11 देशांमध्ये UPI सेवा सुरू करण्यात आली. श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये UPI पेमेंट सेवा सुरू केल्यानंतर, UPI पेमेंट असलेल्या देशांची संख्या 11 वरून 13 वर पोहोचली आहे.