मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना झटका, भारतीय सैन्य मागे नाही घेणार भारत
भारत आणि मालदीवमध्ये वादाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठी बातमी समोर आली आहे. भारत मालदीवमधून आपले सैन्य मागे घेणार नाहीये. राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी सैन्य मागे घेण्यासाठी 15 मार्चपर्यंत अल्टिमेटम दिला होता. पण आता भारत आणि मालदीव यांच्यात सैन्याच्या देवाणघेवाणीचा करार झाला आहे.
India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यातील तणावामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले गेले होते. मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय सैन्याला माघारी बोलवण्याची मागणा केली होती. पण भारत भारतीय सैन्य माघारी बोलवणार नाहीये. कारण भारत आपले सैनिक मागे घेण्याऐवजी त्यांची अदलाबदल करेल. मालदीव आणि भारत यांच्यातील उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोअर ग्रुपची बैठक
दिल्लीत दोन्ही देशांच्या कोअर ग्रुपची बैठक पार पडली, ज्यामध्ये मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना परत बोलवण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. परराष्ट्र मंत्रालयाने येथे सांगितले की, दोन्ही बाजूंनी मालदीवमध्ये भारतीय विमानचालन प्लॅटफॉर्म चालू ठेवण्यासाठी काही परस्पर स्वीकारार्ह उपायांवर सहमती दर्शविली. गेल्या महिन्यात मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारताला १५ मार्चपर्यंत आपले सर्व लष्करी कर्मचारी परत माघारी बोलवण्यास सांगितले होते.
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली की भारत सरकार 10 मार्चपर्यंत तीन एव्हिएशन प्लॅटफॉर्मपैकी एका प्लॅटफॉर्मवर लष्करी कर्मचाऱ्यांची बदली पूर्ण करेल आणि इतर दोन प्लॅटफॉर्मवर 10 मे पर्यंत लष्करी कर्मचाऱ्यांची बदली पूर्ण करेल.”
मानवतावादी सहाय्य करण्यासाठी तैनात
मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, दोन्ही बाजूंनी मालदीवच्या लोकांना मानवतावादी सहाय्य आणि वैद्यकीय निर्वासन सेवा प्रदान करणाऱ्या भारतीय विमानचालन प्लॅटफॉर्मच्या सतत ऑपरेशनसाठी काही परस्पर स्वीकार्य उपायांवर सहमती दर्शविली आहे. माले येथे उच्च-स्तरीय कोअर ग्रुपची पुढील बैठक होणार आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले की, बैठकीदरम्यान, दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू केली. ज्यात सध्या सुरू असलेल्या विकास सहकार्य प्रकल्पांच्या अंमलबजावणीला गती देणे यासह भागीदारी वाढविण्याच्या दिशेने द्विपक्षीय सहकार्याशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. डिसेंबरमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइझू यांच्यात दुबईतील COP28 शिखर परिषदेदरम्यान झालेल्या बैठकीनंतर, दोन्ही बाजूंनी कोअर ग्रुप तयार करण्याचा निर्णय घेतला होता.
मालदीवमध्ये 80 भारतीय सैनिक
सध्या, सुमारे 80 भारतीय लष्करी कर्मचारी मालदीवमध्ये आहेत, प्रामुख्याने दोन हेलिकॉप्टर आणि एक विमान चालवण्यासाठी त्यांना तेथे तैनात करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत शेकडो वैद्यकीय बचाव आणि मानवतावादी मदत मोहिम पूर्ण केली आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते. पदभार स्वीकारल्यानंतर मुइझ्झू जे चीन समर्थक नेते मानले जातात ते म्हणाले होते की ते देशातून भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांना हद्दपार करून त्यांचे निवडणूक वचन पूर्ण करतील. मुइज्जू यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भारत समर्थक उमेदवार इब्राहिम मोहम्मद सोलिह यांचा पराभव केला होता. मालदीव हा हिंदी महासागर क्षेत्रातील भारताचा प्रमुख सागरी शेजारी आहे आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये एकूण द्विपक्षीय संबंध मागील (मालदीव) सरकारच्या काळात प्रगतीपथावर होते.
मुइझू यांनी 17 नोव्हेंबर रोजी मालदीवचे नवे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर त्यांनी भारताला १५ मार्चपर्यंत आपले लष्करी कर्मचारी आपल्या देशातून काढून घेण्यास सांगितले. सर्वोच्च पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी मालदीवमधून भारतीय सैन्य मागे घेण्याचे आवाहन केले होते. 14 जानेवारी रोजी कोअर ग्रुपच्या पहिल्या बैठकीनंतर, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले होते की दोन्ही बाजू मालदीवमधील लोकांना मानवतावादी सहाय्य आणि वैद्यकीय निर्वासन सेवा प्रदान करणाऱ्या भारतीय विमानचालन व्यासपीठाच्या ऑपरेशनसाठी परस्पर स्वीकार्य तोडगा शोधण्याचा विचार करत आहेत.