लष्कराचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले; एक पायलट शहीद; दुसरा गंभीर
भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर सकाळी नियमित उड्डाणासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टर अचानक कोसळले.
नवी दिल्लीः अरुणाचल प्रदेशातील (Arunachal Pradesh) तवांगजवळ (Tawang) भारतीय लष्कऱाचे चित्ता हेलिकॉप्टर कोसळले (Cheetah helicopter crashed) असून या अपघातात एक पायलट शहीद झाला असून दुसरा पायलट गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर भारतीय लष्करातील अधिकारी आणि सैनिक घटनास्थळी दाखल झाले असून आता तपास सुरु करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलट होते, त्यापैकी एक पायलट लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव हे शहीद झाले आहेत. तर त्याचवेळी दुसऱ्या पायलटला गंभीर अवस्थेत जवळच्या लष्करी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
भारतीय लष्कराचे हेलिकॉप्टर सकाळी नियमित उड्डाणासाठी रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्टर अचानक कोसळले.
हा अपघात झाल्यानंतर दोन्हीही वैमानिकांना गंभीर अवस्थेत लष्कराच्या रुग्णालयामध्ये दाखल केले गेले होते. मात्र या अपघातातील लेफ्टनंट कर्नल सौरभ यादव शहीद झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या अपघातानंतर लष्करी अधिकाऱ्यांना हा अपघात कसा काय झाला असे विचारले असता त्याची माहिती अजून कळू शकली नसल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये देशातील पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांचाही हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचे पद 9 महिन्यांहून अधिक काळ रिक्त राहिले होते.
नुकतेच निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांना देशाचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) बनवण्यात आले आहे. या अपघातानंतर लष्करातील अधिकारी आणि सैनिक घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा तपास सुरु असून जखमी अवस्थेत असलेल्या जवानावर सध्या उपचार सुरु आहेत.