India vs China : श्रीलंकेत घमासान, भारत-चीनच्या युद्धनौका आल्या आमने-सामने
India vs China : जमीन असो, वा समुद्र प्रत्येक ठिकाणी चीन वर्चस्व मिळवण्याचा, दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. भारताने नेहमीच चीनच्या या दादागिरीला जशास तस प्रत्युत्तर दिलं आहे. आता श्रीलंकेत भारत आणि चीनच्या युद्धनौका आमने-सामने आल्या आहेत.
आज प्रत्येक क्षेत्रात भारत आणि चीनमध्ये स्पर्धा आहे. चीनच्या विस्तारवादाच्या धोरणाला भारताने नेहमीच कडाडून विरोध केला आहे. प्रसंगी चीनशी दोन हात सुद्धा केले आहेत. आज सीमा भागात भारत आणि चीनच सैन्य आमने-सामने आहे. जमिनीप्रमाणे सागरी क्षेत्रातही वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु असतो. आता श्रीलंकेच्या कोलंबो बंदरात भारत आणि चीनच्या युद्धनौका आमने-सामने आल्या आहेत. भारतीय नौदलाची INS मुंबई ही मिसाइलने सुसज्ज असलेली डिस्ट्रॉयर सोमवारी सकाळी कोलंबो बंदरात पोहोचली. त्याचवेळी चीनच्याही तीन युद्धनौका तिथे होत्या. तीन दिवसांचा प्रवास करुन INS मुंबई कोलंबो बंदरात दाखल झाली आहे.
समुद्री चाच्यांविरोधी ऑपरेशनचा भाग असलेल्या चिनी युद्धनौकेचा आता, आधीपेक्षा जास्त काळ हिंद महासागर क्षेत्रात वावर आहे. हिंद महासागर क्षेत्रातील चीनचा वाढता वावर हे भारतासाठी एक आव्हान आहे. हिंद महासागरात चीन आणि पाकिस्तानचा सामना करण्यासाठी भारताला 140 युद्धनौकांची गरज आहे. सध्या कोलंबो गोदीत असलेल्या तिन्ही चिनी युद्धनौकांनी हिंद महासागर क्षेत्रात प्रवेश केल्यापासून भारतीय नौदलाच त्यांच्यावर बारीक लक्ष होतं.
INS मुंबईवर किती नौसैनिक?
INS मुंबई या 163 मीटर लांब जहाजावर 410 नौसैनिक तैनात आहेत. भारतीय नौदलाची ही युद्धनौका पहिल्यांदा श्रीलंकेत आली आहे. सोमवारीच चीनच्या फेई, वुझिशान आणि किलियानशान या युद्धनौका कोलंबोत दाखल झाल्या. चीनी लिबरेशन आर्मीच फेई युद्धनौका 144.50 मीटर लांब आहे. या जहाजावर 267 सदस्य आहेत. वुझिशान युद्धनौका 210 मीटर लांब आहे. यावर 872 क्रू मेंबर तैनात आहेत. किलियानशान 210 मीटर लांबीची चिनी युद्धनौका आहे. यावर 334 सदस्य आहेत.