बिपरजॉय चक्रीवादळामुळे भारताचं प्रवासी विमान थेट पाकिस्तानात भरकटलं,
भारताचं प्रवासी विमान बिपरजॉय चक्रीवादळामुळे हवेत भरकटलं आणि थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत जावून पोहोचलं. पाकिस्तानच्या लाहोर शहरावर हे विमान घिरट्या घालत होतं. त्यामुळे पाकिस्तानातही एकच खळबळ उडाली.
नवी दिल्ली : अरबी समुद्राच्या पोटात मोठं चक्रीवादळ घोंघावतंय. हे चक्रीवादळ पुढच्या दोन दिवसात जास्त रौद्र रुप धारण करण्याची शक्यता आहे. या वादळाची सध्याची दिशा पाहता महाराष्ट्राच्या किनारपट्टीला या वादळाचा फार फटका बसणार नाही. पण तरीही कोकणात समुद्र कालपासून खवळलेला आहे. किनारी भागात समुद्राच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झालीय. लाटांचा वेग आणि उंची वाढली आहे. समुद्र जणू काही खूप खवळलाय, असं जाणवतंय. या वादळामुळे मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडलाय. हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील अनेक भागात प्रचंड जोराने वारे वाहत आहेत. या वाऱ्यामुळे विमान वाहतुकीवरही परिणाम होताना दिसत आहे. हवामान बदलामुळे काल अनपेक्षित घटना घडली.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे वातावरणात मोठा बदला झालाय. अनेक भागांमध्ये प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. या वाऱ्याचा फटका भारतीय हवाई वाहतूकवरही पडला. अनेक विमानांची सध्या उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. तर शनिवारी गो इंडिगोचं विमान खराब हवामानामुळे भरकटलं आणि थेट पाकिस्तानात जावून पोहोचलं. हे विमान लाहोरमध्ये हवेत घिरट्या घालत होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
विमान अमृतसर येथून अहमदाबादच्या दिशाला निघालेलं
संबंधित गो इंडिगोची फ्लाईट ही अमृतसर येथून अहमदाबादच्या दिशाला निघाली होती. पण खराब हवामानामुळे ही फ्लाईट हवेत भरकटली आणि थेट पाकिस्तानच्या हवाई हद्दीत जाऊन पोहोचली. हे विमान थेट लाहोरपर्यंत जावून पोहोचलं. भारतीय विमान लाहोर शहरात घिरट्या घालत असल्याचं पाकिस्तान यंत्रणेच्या लक्षात आलं नंतर तिथेही एकच खळबळ उडाली. पण संबंधित विमान हे प्रवासी विमान असल्याचं त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कोणतंही पाऊल उचललं नाही.
भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीत नो एन्ट्री
भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय प्रवासी विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून प्रवास करण्यास पाकिस्तान सरकारकडून सक्त मनाई आहे. त्यामुळे भारतीय प्रवासी विमानं सुद्धा आखाती देश, युरोप किंवा रशियाच्या मार्गाला जात असताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून न जाता इतर मार्गाने जातात. या दरम्यान शनिवारी अचानक भारतीय विमान पाकिस्तानच्या हद्दीत शिरल्याने पाकिस्तानातीलही यंत्रणा अलर्ट झाली. पण नंतर त्यांना खरी परिस्थिती समजताच ते शांत झाले.
संबंधित घटना ही गेल्या काही महिन्यांमध्ये पहिल्यांदाच घडली आहे. दरम्यान, पाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या घटनेवर प्रतिक्रिया दिली. खराब हवामान असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी परवानगी असते, अशी प्रतिक्रिया संबंधित अधिकाऱ्याने दिली.