भारताची कुटनिती यशस्वी, चीनला जोरदार झटका, मालदीवमध्ये राहणार भारताचे विमाने अन् हेलिकॉप्टर
India Maldives | चीनच्या दबावात येऊन मालदीवकडून भारतीय सैन्य, विमाने, हेलिकॉप्टर माघारी बोलवण्याची मागणी करत होता. मालदीव सरकारच्या मागणीनंतर भारताकडून कुटनितीचा वापर सुरु झाला. त्यात अखेर भारताला यश आले आहे.
नवी दिल्ली | दि. 29 फेब्रुवारी 2024 : भारत आणि मालदीव यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी मालदीवमधून भारतीय सैन्य, विमाने अन् हेलिकॉप्टर माघारी बोलवण्याची मागणी केली होती. त्यासाठी त्यांनी भारताला १० मार्चची मुदत दिली होती. चीनच्या दबावात येऊन मालदीवकडून भारतीय सैन्य, विमाने, हेलिकॉप्टर माघारी बोलवण्याची मागणी करत होता. मालदीव सरकारच्या मागणीनंतर भारताकडून कुटनितीचा वापर सुरु झाला. त्यात अखेर भारताला यश आले आहे. मालदीवने भारताचा प्रस्ताव मान्य करत चीनला मोठा झटका दिला आहे.
भारताचे यश, चीनला झटका
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू आपल्याच चक्रव्यूहमध्ये अडकले आहे. मालदीवमधून भारताला बाहेर काढण्याच्या प्रयत्नास मोइज्जू यांना यश आले नाही. भारताच्या कुटनितीमुळे मालदीवसमोर प्रस्ताव स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय राहिला नाही. आता मालदीवमध्ये भारतीय नौदलाचे डॉर्नियर विमान, हेलिकॉप्टर, बोट्स आणि दुसरे सैन्य उपकरण राहणार आहेत. मालदीवमध्ये भारताचे पथक वैद्यकीय बचाव आणि मानवतावादी मदत मोहिम पूर्ण करण्यासाठी असते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मुइज्जू सत्तेवर आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले होते.
चीनच्या दबाबामुळे केली होती मागणी
चीनच्या दबावामुळे राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांनी भारतीय सैनिक आणि विमाने, हेलिकॉप्टर परत नेण्यासाठी 10 मार्चची वेळ दिली होती. त्यापूर्वीच भारताची कुटनीती यशस्वी झाली. भारताने मालदीव सरकाराची समजूत काढली. भारताचे सैनिक हेलिकॉप्टर, विमाने मालदीवमधील लोकांच्या वैद्यकीय सुविधेसाठी आहे. आप्तकालीन परिस्थितीत ते कामाला येतात. ते परत गेल्यास त्याचा परिणाम मालदीवमधील नागरिकांवर होणार आहे.
अशी झाली तडजोड
भारताच्या प्रस्तावानंतर मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मोईज्जू यांचे मत बदलले. मालदीवमधील जनतेमध्ये आपली प्रतिमा चांगली करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव स्वीकारला. परंतु या प्रकरणात मधली तडजोड काढण्याची विनंती केली. त्यानंतर भारताने नौदलाच्या सैनिकांऐवजी सिव्हिलियन पायलट ठेवण्याचा प्रस्ताव भारताने ठेवला. तो मान्य केला. त्यानंतर भारताची पहिली टीम बुधवारी मालदीवमध्ये दाखल झाली.