रेल्वे प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या लगेजसंदर्भातील नवीन नियम, अन्यथा होईल अडचण
Railway Luggage Limit 2025 :जनरल बोगी किंवा सेंकड सिटींग क्लासमधून प्रवास करणाऱ्यांसाठी सामानाची मर्यादा कमी आहे. जनरल बोगीमधून रेल्वे प्रवाशांना 35 किलोपर्यंतचे सामान घेऊन जाता येणार आहे. म्हणजे जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना केवळ 35 किलोपर्यंतचे सामान नेता येणार आहे.

Railway Luggage Limit 2025 : भारतीय रेल्वे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. रेल्वेने रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. त्या सर्वांना रेल्वेच्या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. रेल्वेने एक एप्रिलपासून नवीन नियम तयार केला आहे. त्यानुसार रेल्वेतून लगेज घेऊन जाण्याची मर्यादा निश्चित केली आहे. रेल्वेत आता मनासारखे सामान घेऊन जाता येणार नाही.
तिकिटांच्या श्रेणीनुसार मर्यादा
रेल्वेतून सामान घेऊन जाण्याची मर्यादा तिकीटाच्या श्रेणीनुसार असणार आहे. म्हणजे आता तुम्ही फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करत असाल तर मर्यादा जास्त असणार आहे. परंतु सेकंड सिटींग क्लास किंवा जनरल प्रवासासाठी मर्यादा कमी असणार आहे. रेल्वेने फर्स्ट क्लासमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी कोणतेही शुल्क न भरता 70 किलोग्रॅम वजनाचे सामान घेऊन जाण्यास परवानगी दिली आहे. तसेच एसी 2-टियरसाठी 50 किलोग्रॅमपर्यंत तर एसी 3-टियर आणि स्लीपर क्लाससाठी 40 किलोग्रॅमपर्यंत वजनाचे सामान घेऊन जाण्यास परवानगी आहे. या मर्यादेत सामना घेऊन जाणाऱ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही.
…तर अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार
जनरल बोगी किंवा सेंकड सिटींग क्लासमधून प्रवास करणाऱ्यांसाठी सामानाची मर्यादा कमी आहे. जनरल बोगीमधून रेल्वे प्रवाशांना 35 किलोपर्यंतचे सामान घेऊन जाता येणार आहे. म्हणजे जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना केवळ 35 किलोपर्यंतचे सामान नेता येणार आहे. त्यापेक्षा जास्त सामान घेऊन जाणाऱ्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.




भारतीय रेल्वेच्या नियमानुसार मर्यादेपेक्षा जास्त सामान असल्यावर अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. तुमचे सामान मर्यादेपेक्षा जास्त आढळल्यास निर्धारित शुल्कापेक्षा दीड पट रक्कम भरावी लागते. यामुळे प्रवास सुरु करण्यापूर्वी अतिरिक्त वजनाचे बुकींग रेल्वेच्या बँगेज ऑफीसमध्ये करुन घेणे गरजेचे आहे. रेल्वेतून काही धोकादायक आणि प्रतिबंधित वस्तू नेण्यास बंदी आहे. जसे ज्वलनशील पदार्थ, गॅस सिलिंडर, स्फोटक पदार्थ, ऍसिड आणि इतर संक्षारक पदार्थ वाहून नेण्यास परवानगी देत नाही. तसेच 5 ते 12 वर्षे वयोगटातील मुलांना त्यांच्या तिकीट वर्गानुसार निम्मे मोफत सामान घेऊन जाता येते.
भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार, काही वस्तू मोफत सामान अंतर्गत येत नाहीत. यामध्ये स्कूटर, सायकल इत्यादींचा समावेश आहे. या वस्तू रेल्वेतून घेऊन जात असल्यास त्याचे स्वतंत्र बुकींग करावे लागेल.