हिंमत आहे तर रोखून दाखवाच, अमेरिकेच्या निर्बंधानंतर ही भारताची रशियासोबत डील
रशिया आणि युक्रेन या दोन देशातील युद्धाने जग दोन गटात वाटला गेला आहे. पण भारताने दोन्ही देशांना शांतीने चर्चा करुन प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले आहे. अनेक देशांनी रशियावर निर्बंध घातले आहेत. पण भारताने मात्र रशियाकडून तेल खरेदी करणे सुरुच ठेवले आहे. भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी केले आहे.
Russia-India Deal : रशिया आणि युक्रेन यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. रशियाकडून युक्रेनवर सतत हल्ले सुरु आहेत. त्यामुळे अनेक देशांनी युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी रशियासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. त्यामुळे रशियाच्या तेल व्यापारावर देखील याचा परिणाम झाला आहे. अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी निर्बंध घातल्याने भारताला मात्र याचा फायदा होत आहे. भारताने पाश्चिमात्य देशांचे आदेश धुडकावून लावले आहेत. भारत आणि रशिया यांच्यातील तेल व्यापारावर कोणताही परिणाम झालेला नाही. उलट तेल खरेदीचे प्रमाण वाढले आहे. भारत आपल्या जवळचा मित्र रशियाकडून मोठ्या प्रमाणावर तेल खरेदी करत आहे.
रशियन तेलावर निर्बंध
अमेरिकेने रशियाकडून कच्च्या तेलावर प्रति बॅरल $60 या G7 किंमत मर्यादेचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे. 23 फेब्रुवारी रोजी अमेरिकेने रशियाच्या मालकीच्या शिपिंग कंपनी सोव्हकॉमफ्लॉट आणि त्याच्याशी संबंधित 14 टँकरवर बंदी घातली होती. पण याचा भारतावर कोणताही परिणाम झालेला नाही.
भारतावर कोणताही परिणाम नाही
भारतीय रिफायनर्स कंपन्या डिलिव्हरीच्या आधारावर रशियन तेल खरेदी करतात. याचा अर्थ असा की टँकर भाड्याने घेणे आणि संबंधित प्रक्रिया ही तेल पुरवठादाराची जबाबदारी आहे. भारतीय खरेदीदार कच्च्या तेलाची किंमत देतात. त्यांचा तेल वाहतुकीत कोणताही सहभाग नसतो. सोव्हकॉमफ्लॉट टँकरमधून कच्च्या तेलाची डिलिव्हरी आता चीनला हस्तांतरित केली जात आहे. चीन हा रशियनकडून कच्च्या तेलाचा दुसरा सर्वात मोठा खरेदीदार आहे. रशियन तेल व्यापारात गुंतलेल्या मोठ्या टँकरच्या ताफ्यातून भारताकडे वाहणे सुरूच राहण्याची शक्यता आहे.
भारत सर्वात मोठा ग्राहक
भारतीय डिलिव्हरीच्या आधारावर रशियन क्रूड खरेदी करत आहेत. याचा अर्थ जहाजाच्या चार्टरिंग आणि विम्याशी त्यांचा काहीही संबंध नाही. फेब्रुवारी २०२२ पासून भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवली. पाश्चिमात्य देशांनी रशियाकडून तेल खरेदीवर निर्बंध घातल्याने भारताला त्याचा फायदा झाला. रशियाने क्रूडवर मोठ्या प्रमाणात भारताला सूट देण्यास सुरुवात केली. युक्रेनच्या युद्धापूर्वी भारताला मिळत असलेले तेल हे खूप कमी होते. तेव्हा रशियाला याचा इतका फरक पडत नव्हता. पण जेव्हा पाश्चात्य देशांनी निर्बंध टाकले तेव्हा भारत हा रशियासाठी सर्वात महत्त्वाचा देश बनला. त्यामुळे आता इराक आणि सौदी अरेबियाच्या पुढे रशिया हा भारतासाठी कच्च्या तेलाचा सर्वात मोठा स्त्रोत बनला आहे.