Chandrayaan-3 update : चंद्रयान नव्हे याआधी मोहीमेचे नाव वेगळे होते, अटल बिहारी वाजपेयींनी बदलले नाव
भारताने चंद्रयान-3 चे चंद्राच्या अवघड अशा दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लॅंडींग करुन अनोखा इतिहास रचला आहे. परंतू या मोहीमेचे नाव आधी वेगळे होते.
नवी दिल्ली | 23 ऑगस्ट 2023 : चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याची किमया साधली आहे. आता काही तासांनी चंद्रयानाच्या विक्रम लॅंडरमधून रोव्हर बाहेर येण्याची महत्वपूर्ण प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. इस्रोच्या या महत्वाकांक्षी मोहीमेकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले होते. अशात चंद्रयानाच्या बाबतीत एक रोचक कहानी समोर आली आहे. चंद्रयानाच्या उत्पत्ती आणि नामकरणाबाबतची ही कहानी आहे. काय आहे ही रहस्यमय कहानी पाहूयात…
चंद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर 23 ऑगस्ट 2023 रोजीच्या सायंकाळी 6.04 वाजता यशस्वी लॅंडींग केले आहे. चंद्रयान-1 ही मोहीम साल 2008 जरी सुरु झाली असली तरी त्याआधी अनेक वर्षे आधी तिची रुजूवात झाली आहे. हे वर्ष होते 1999, तेव्हा केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार होते. त्यांच्या सरकारने चंद्रयान मोहीमेला मंजूरी दिली होती आणि तिचे नावही ठेवले होते. संशोधकांनी या मोहीमेचे नाव सोमयान ठेवले होते. चंद्राला सोम म्हणतात. त्यावरुन हे नाव दिले होते.
मोहीमेचे नाव असे बदलले
डेक्कन क्रॉनिकलमध्ये आलेल्या बातमीनूसार भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे तत्कालिन अध्यक्ष डॉ. के.कस्तूरीरंगन यांनी सांगितले की वाजपेयी यांनी ‘सोमयान’ ऐवजी मोहीमेचे नाव ‘चंद्रयान’ असे समर्पक वाटेल असे सांगितले. देश एक आर्थिक शक्ती म्हणून पुढे येत आहे. आपण चंद्रावर अनेक मोहीमा राबविणार आहोत. कस्तूरीरंगन पोखरण-2 ला एक वर्षे झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मे 1999 मध्ये नवी दिल्लीत होते. त्यावेळी एका वेबसाईटशी बोलताना त्यांनी सांगितले की मोहीमेची योजना चार वर्षांत तयार झाली होती. त्यानंतर अमलबजावणीसाठी आणखी चार वर्षे लागली.