फक्त खेळायचं निमित्त झालं अन्… अवघ्या 16 व्या वर्षी हार्ट अटॅकने मृत्यू; कुटुंबाने घेतला ‘हा’ निर्णय
देशात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंदूरमध्येही हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इंदूरमध्ये गेल्या तीन दिवसात 11 लोकांना हृदयविकाराचा झटका आला आहे.
इंदूर: देशात गेल्या काही दिवसांपासून हृदविकाराने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. तरुण आणि बुजुर्गांमध्ये हे प्रमाण अधिक आहे. उत्तर भारतात हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक वाढलं आहे. कडाक्याच्या थंडीमुळे या घटना घडत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, इंदूरमध्ये अवघ्या 16 वर्षाच्या मुलीचा खेळता खेळता हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. कोणताही आजार नसताना या मुलीचा अचानक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.
वृंदा त्रिपाठी असं या विद्यार्थीनीचं नाव आहे. ती अवघ्या 16 वर्षाची होती. इयत्ता 11 वीला शिकत होती. तिला कोणताही आजार नव्हता. नेहमीप्रमाणे ती कॉलेजला गेली होती. खेळत असताना अचानक तिच्या छातीत दुखायला लागलं. त्यामुळे ती चक्कर येऊन खाली पडली आणि बेशुद्ध झाली. त्यामुळे महाविद्यालयाच्या स्टाफने तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण उपचार सुरू असतानाच तिने या जगाचा निरोप घेतला होता.
शवविच्छेदन अहवाल येणार
हार्ट अटॅकमुळे तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. तिचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूचं नेमकं कारण कळणार आहे. मात्र, अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. लहान मुलांमध्येही हार्ट अटॅकचं प्रमाण वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
डोळे दान करण्याचा निर्णय
वृंदाचा अचानक मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. त्रिपाठी कुटुंबांने वृंदाचे डोळे दान करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्रिपाठी कुटुंबाने मुस्कान ग्रुपशी संपर्कही साधला आहे. या ग्रुपचे जितू बागानी आणि अनिल गोरे हे त्रिपाठी कुटुंबांना भेटले. त्यानंतर वृंदाचे डोळे इतरांना देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.
3 दिवसात 11 दगावले
दरम्यान, देशात हार्ट अटॅकच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. इंदूरमध्येही हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे. इंदूरमध्ये गेल्या तीन दिवसात 11 लोकांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यामुळे या लोकांचा मृत्यू झाला आहे. भारत-न्यूझीलंड सामना पाहतेवेळी एका पोलीस अधिकाऱ्याला हार्ट अटॅक आला होता. त्यामुळे त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.