IPS Success Story : तुम्ही म्हणाल, गाव-खेड्यातली महिला असेल, अहो नाही… ‘ही’ महिला आहे धडकेबाज IPS
गुजरात पोलीस दलातील आयपीएस अधिकारी सरोज कुमारी यांनी नुकतेच जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. त्यांचे पारंपारिक राजस्थानी वेशभूषेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सरकारी शाळेतून शिक्षण घेतलेल्या सरोज कुमारी यांची यशोगाथा प्रेरणादायी आहे. त्यांच्या कर्तृत्व आणि साधेपणाचे कौतुक सर्वत्र होत आहे.
मोठमोठ्या पदावर पोहोचलेली माणसं ही त्यांच्या कतृत्वासोबतच त्यांच्या स्वभावामुळे मोठी झालेली असतात. कितीही मोठं झालं तरी आपले पाय जमिनीवर ठेवावीत, असा विचार अंगीकारणारी माणसं फार कमी आहेत. पण अशी माणसं या जगात खरंच आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे गुजरात पोलीसमध्ये कार्यरत असलेल्या आयपीएस सरोज कुमारी! आयपीएस सरोज कुमारी यांचे राजस्थानच्या पारंपरिक वेशभूषेतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये त्यांच्यासोबत दोन नवजात बालकदेखील आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अनेकांना वाटेल की, फोटोतील व्यक्ती ही एक सर्वसाधारण राजस्थानी कुटुंबातील महिला आहे. पण जेव्हा लोकांना या महिलेच्या कर्तृत्वाची माहिती होत आहे तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतोय. अनेकांकडून सरोज कुमारी यांचं कौतुक केलं जात आहे. आयपीएस अधिकारी सरोज कुमारी यांनी नुकतंच दोन नवजात बालकांना जन्म दिला. त्यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली. “देवाने आशीर्वादाच्या रुपात मुलगा आणि मुलगी दिले आहेत”, असं सरोज कुमारी यांनी म्हटलं आहे. सरोज कुमारी यांच्याकडून करण्यात आलेला फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यांच्यावर सर्वच स्तरावरुन अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय.
आयपीएस सरोज कुमारी या राजस्थानच्या आहेत. पण त्या सध्या गुजरात पोलिसात कर्तव्यावर आहेत. विशेष म्हणजे नेहमी पोलीस वर्दीवर दिसणाऱ्या सरोज कुमारी यांना पारंपरिक वेशभूषेत पाहिल्यानंतर अनेकांकडून त्यांचं कौतुक होत आहे. एवढ्या मोठ्या पोलीस अधिकारी बनल्या तरी त्यांचं गावाशी, संस्कृतीसोबत जे घट्ट नातं जोडलं गेलं आहे त्याचं कौतुक होत आहे. आयपीएस सरोज कुमारी यांचं दिल्लीतील नामांकीत डॉक्टर मनीष सैनी यांच्यासोबत लग्न झालं आहे. सरोज कुमारी आणि डॉ. मनीष सैनी यांचा विवाह जून 2019 मध्ये झाला होता. सरोज कुमारी यांचे पती मनीष सैनी यांनीदेखील सोशल मीडियावर आपल्या नवजात बाळांचे फोटो शेअर केले आहेत.
सरकारी शाळेत शिक्षण घेतलं
मेहनत करणाऱ्या व्यक्तीला कोणीच थांबवू शकत नाही. मग ती व्यक्ती कोणत्याही शाळेत शिकली तरी त्याची जिद्द असेल तर ती व्यक्ती यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणारच. सरोज कुमारी यांची कहाणीदेखील तशीच आहे. सरोज कुमारी यांनी सरकारी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं आहे. सरोज कुमारी यांचा जन्म राजस्थानच्या झुंझुनूं जिल्ह्यातील चिडावा उपखंड येथील बुडानिया गावात झाला होता. बनवारी लाल मेघवाल हे त्यांचे वडील आमि सेवा देवी असं त्यांच्या आईचं नाव आहे. सरोज कुमारी या त्यांच्या बुडानिया गावाच्या पहिल्या आयपीएस अधिकारी आहेत.
सरोज कुमारी यांचं धडाकेबाज काम
आयपीएस सरोज कुमारी यांनी आपल्या धडाकेबाज कामातून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी बोटाद येथे एसपी असताना अनेक महिलांना देहविक्रीच्या काळ्या दुनियेत जाण्यापासून रोखलं होतं. अनेकांना त्यातून बाहेर काढलं होतं. तसेच बडोद्यात मुसळधार पावसावेळी त्यांचा बचावकार्याचे फोटो आणि व्हिडीओदेखील व्हायरल झाले होते. त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. कोरोना संकट काळात त्यांनी आपली जबाबदारी पार पाडत असताना समाजकार्याचं मोठं काम केलं होतं. त्यांनी लॉकडाऊनच्या काळात अनेक गरजू नागरिकांना पोलीस किचन हा उपक्रम सुरु करुन अन्न दिलं होतं. त्यांच्या अशा विविध कामांमुळे त्यांना कोविड 19 महिला योद्धा म्हणून पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. सरोज कुमारी सध्या गुजरातच्या सूरत येथे डीसीपी म्हणून कार्यरत आहेत. तसेच बोटाद येथे त्यांनी एसपी म्हणूनही कार्यभार सांभाळला आहे.