राम मंदिराच्या उद्घाटनाआधीच अयोध्येत वाढली गुंतवणूक, या कंपन्या उभारणार प्लांट
22 जानेवारीला पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्याहस्त रामलल्लाचा अभिषेक होणार आहे. अयोध्येत जोरदार तयारी सुरु आहे. अयोध्येतील राम मंदिर मोठे तीर्थक्षेत्र बनण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आतापासूनच मोठ्या मोठ्या कंपन्यांनी येथे आपले आउटलेट सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. हे मोठे बिझनेस हब बनण्याच्या तयारीत आहे.
Ayodhya Ram Mandir : राम मंदिराबाबत देशातील जनतेत प्रचंड उत्साह आहे. अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची तयारीही जोरात सुरू आहे. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिरात राम लल्लाचा अभिषेक करणार आहेत. अयोध्येत यानंतर सर्वसामान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. राम मंदिराच्या उद्घाटनाचा प्रसंग लक्षात घेऊन अनेक कंपन्यांनीही जोरात तयारी सुरू केली आहे. विशेषत: FMCG आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना यामध्ये मोठी संधी दिसत आहे. अशा स्थितीत राम मंदिर सुरू होण्यापूर्वीच अयोध्या बिझनेस हब बनण्याच्या तयारीत आहे.
अयोध्या बनणार व्यवसायाचे केंद्र
अयोध्येत उभारले जाणारे राम मंदिर हे देशातील सर्वात महत्त्वाचे धार्मिक केंद्र आणि तीर्थक्षेत्र ठरणार आहे. रामजन्मभूमी मंदिरावर कोट्यवधी लोकांची श्रद्धा असून या मंदिराच्या उभारणीची प्रतीक्षा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. अशा परिस्थितीत आगामी काळात अयोध्या हे धार्मिक पर्यटन आणि तीर्थक्षेत्राचे मोठे केंद्र बनणार आहे. ज्याचा फायदा येथील अर्थव्यवस्थेला होईल. या बदलात लाखो लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, FMCG कंपन्या आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रासाठीही संधी निर्माण होत आहेत. येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू होणार आहेत.
बिसलेरी ते McD पर्यंत उभारणार प्लांट
ET च्या अहवालानुसार, FMCG आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांनी त्यांची तयारी केली आहे. मिनरल वॉटर कंपनी बिसलेरी इंटरनॅशनल अयोध्येत नवीन प्लांट उभारत आहे. येत्या काही दिवसांत अयोध्येत बाटलीबंद पाणी, शीतपेये, स्नॅक्स, किराणा सामान आदींची मागणी वाढू शकते, अशी कंपनीची अपेक्षा आहे. पार्ले प्रॉडक्ट्स ही बिस्किटे आणि इतर FMCG उत्पादने बनवणारी कंपनी, अयोध्येत आणि आसपासचे वितरण नेटवर्क वाढवत आहे. मॅकडोनाल्ड आणि बर्गर सिंग अयोध्या-लखनौ महामार्गावर एक नवीन आउटलेट उघडत आहेत.
पर्यटकांचा ओघ वाढणार
राम मंदिर पूर्ण झाल्यावर अयोध्येतील पर्यटन 8-10 पटीने वाढू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे शहरातील तरंगणारी लोकसंख्या म्हणजेच तात्पुरती लोकसंख्या वाढेल. हॉस्पिटॅलिटी कंपनी ओयोने अलीकडेच सांगितले होते की, राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वीच हॉटेल बुकिंगमध्ये 70-80 टक्क्यांनी वाढ होत आहे. उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या आकडेवारीनुसार, 2021 मध्ये अयोध्येला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या केवळ 3.25 लाख होती, जी 2022 मध्ये 85 पटीने वाढून 2.39 कोटी झाली. आता मंदिर तयार झाल्यावर त्यात 8-10 पट वाढ होईल, त्यामुळे दरवर्षी अंदाजे 20-25 कोटी पर्यटक अयोध्येत येऊ शकतात.