Israel-Hamas War | युद्ध सुरु असताना हमास संदर्भात इस्रायलची भारताकडे मोठी मागणी
Israel-Hamas War | नरेंद्र मोदी सरकार इस्रायलची ही मागणी मान्य करेल का?. हमासच्या दहशतवाद्यांनी दक्षिण इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगेच या दहशतवादी कृत्याचा निषेध केला होता. या घटनेचा निषेध करणाऱ्या सुरुवातीच्या जागतिक नेत्यांपैकी ते एक होते.
मुंबई : हमासच्या अतिरेक्यांनी 7 ऑक्टोबरला दक्षिण इस्रायलमध्ये घुसून मोठा दहशतवादी हल्ला केला. मानवतेच्या सर्व मर्यादा त्यांनी ओलांडल्या. महिला, लहान मुलं त्यांनी कोणाला सोडलं नाही. काही भागात त्यांनी अक्षरक्ष: नरसंहार केला. हमासच्या या कृत्यानंतर इस्रायलने थेट युद्ध पुकारलं. इस्रायलकडून गाझा पट्टीत आक्रमक कारवाई सुरु आहे. हमासच्या या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलच समर्थन करताना हमासचा निषेध केला होता. दहशतवाद विरोधी या लढाईत आपण इस्रायलच्या पाठिशी असल्याच पंतप्रधान मोदींनी सांगितलं होतं. आता भारतातील इस्रायली राजदूत नाओर गिलोन यांनी एक मागणी केली आहे. आता वेळ आलीय, अन्य देशांप्रमाणे भारतानेही हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे.
हमासच्या विरोधात सुरु असलेल्या दहशतवाद विरोधी कारवाईत इस्रायलच समर्थन केल्याबद्दल त्यांनी भारताचे आभार मानलेत. इस्रायली राजदूताने पत्रकारांशी संवाद साधला. सात ऑक्टोबरला झालेल्या क्रूर हल्ल्यानंतर इस्रायलने भारताकडे हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केली आहे, असं गिलोन म्हणाले. महत्त्वाचे देश आमच्यासोबत आहेत. हे लोकशाहीवादी देश आहेत. “भारताने आता हमासला दहशतवादी संघटना घोषित करण्याची वेळ आलीय असं मला वाटतं. अमेरिका, कॅनडासह अनेक देशांनी तसच युरोपियन संघाने हमासला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केलय” असं गिलोन यांनी सांगितलं. ‘भारतासाठी हीच योग्य वेळ’
“सुरुवातीलाच ज्या जागतिक नेत्यांनी इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला, पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यापैकी एक आहेत. नैतिकतेसाठी ओळखला जाणारा भारत जगातील एक महत्त्वाचा देश आहे. महत्त्वाचे देश आमच्यासोबत आहेत. भारतासाठी हीच योग्य वेळ आहे, त्यांनी हमासला दहशतवादी संघटना घोषित करावे” असं गिलोन म्हणाले. “इस्रायलसाठी ही पश्चिम आशियातील अस्तित्व वाचवण्याची लढाई आहे. हमासला संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहेत” असं गिलोन म्हणाले.