ISRO ची पुन्हा चंद्रावर स्वारी, लवकरच चांद्रयान – 4 मोहीम राबविणार, काय आहेत वैशिष्ट्ये
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने चांद्रयान-3 मोहीमेच्या यशानंतर आता चांद्रयान - 4 मोहीमेची आखणी केली आहे. या मोहीमेत अत्यंत अवघड जबाबदारी देण्यात आली आहे. ही मोहीम आधीच्या सर्व मोहीमांपेक्षा सर्वस्वी भिन्न असणार आहे. तर पाहूयात चांद्रयान- 4 ची मोहीमेची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहूयात...
बंगळुरु | 10 मार्च 2024 : इस्रो ( ISRO ) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने चांद्रयान – 3 मोहीमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सफल सॉफ्ट लॅंडींग करीत गेल्यावर्षी महा पराक्रम केला. आता इस्रो यापुढील धाडस करणार आहे. त्यासाठी चांद्रयान-4 या मोहिमेची आखणी केली जात आहे. ही मोहीम आधीच्या सर्व मोहीमांपेक्षा किचकट आणि आव्हानात्मक असणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी नॅशनल स्पेस सायन्स सिम्पोजियम (NSSS 2024) मध्ये ही माहिती दिली आहे. तर चांद्रयान – 4 मोहीम नेमकी कशी असणार आहे ते पाहूयात…
इस्रोने गेल्या वर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान-3 उतरवून जगाला तोंडात बोटे घालायला लावले. चंद्रावर सॉफ्ट लॅंडीग करणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत भारत विराजमान झाला आहे. आता चांद्रयान-3 मोहीमेची पुढील चांद्रयान-4 मोहीमेची आखली जाणार आहे. या मोहीमेची तयार इस्रोने सुरु केली आहे. या मोहिमेत आणखी अवघड कार्य केले जाणार आहे. या मोहीमेत चंद्रावरील माती सोबत पृथ्वीवर आणण्याचे काम केले जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी माहीती देताना सांगितले की या चांद्रयान – 4 मोहीमेत एकूण पाच स्पेसक्राफ्ट मॉड्यूल्सचा समावेश असणार आहे. आधीच्या चांद्रयान-3 मोहीमेपेक्षा या नव्या चांद्रयान-4 मोहीमेत दोन अतिरिक्त मोड्युल असणार आहेत. चंद्रायान- 3 मोहीमेत तीन मॉड्यूल होती.
नव्या चांद्रयान – 4 मोहीमेत पाच मॉड्यूल असणार आहेत. त्यात प्रोपल्शन मॉड्यूल, डिसेंडर मॉड्यूल ( चंद्रावर लॅण्ड होणारे ), एसेंडर मॉड्यूल ( सॅम्पलसह लँडरमधून बाहेर पडण्यासाठी ), ट्रान्सफर मॉड्यूल ( चंद्राच्या कक्षेतून असेंडर मॉड्यूल बाहेर नेण्यासाठी ) आणि री-एंट्री मॉड्यूल ( चंद्राचे नमुने घेऊन पृथ्वीवर उतरण्यासाठी ) अशी पाच मॉड्यूल असणार आहेत.
चांद्रयान – 4 दोन टप्प्यात लॉंच होणार
चांद्रयान – 4 मोहीमेची जटीलता पाहता ही मोहीम दोन टप्प्यात लॉंच केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रॉपल्शन, डीसेंडर आणि असेंडर मॉड्यूल लॉंच केले जातील. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ट्रान्सफर आणि रि-एण्ट्री मॉड्यूल लॉंच केले जातील. पहिल्या टप्प्यासाठी भारताचे सर्वात हेव्हीएस्ट रॉकेट GSLV Mk iii वापरले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पोलार सॅटेलाईट लॉंच व्हेईकल रॉकेट ( PSLV ) वापरले जाणार आहे.
चांद्रयान – 4 ची उद्दिष्टे काय
इस्रोच्या आधीच्या कोणत्याही चंद्र मोहिमेने केले नव्हते असे अवघड काम चांद्रयान – 4 करणार आहे. चंद्रावरील खडक आणि माती गोळा करणे आणि स्वत: बरोबर पृथ्वीवर चंद्रावरचे खडक आणि माती आणण्याचे काम चांद्रयान करणार आहे. चांद्रयान – 4 या मोहिमेची कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी 2027 पूर्वी ते लॉंच होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे म्हटले जात आहे. भारताची गेल्यावेळची चांद्रयान – 3 मोहीम गेल्यावर्षी जुलै 2023 मध्ये अंतराळात प्रक्षेपित करण्यात आली होती. 5 ऑगस्ट रोजी चांद्रयान – 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता आणि 23 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरविण्यात इस्रोला यश आले होते. त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश ठरला आहे.