105 वर्षांनंतर रेल्वेने घडविला इतिहास, या प्रमुखपदावर आली महिला अधिकारी
रेल्वे बोर्डाला केंद्र सरकारकडून रेल्वे अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेकॉर्डब्रेक 2.4 लाख कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर अशा पदावर पहिल्यांदाच एका महिला अधिकाऱ्याची नेमणूक झाली आहे.
नवी दिल्ली | 31 ऑगस्ट 2023 : रेल्वेच्या 105 वर्षांच्या इतिहासात एखाद्या महिला अधिकाऱ्याकडे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओपद सोपविण्यात आले आहे. गुरुवारी जया वर्मा सिन्हा यांची भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि सीईओ पदी नेमणूक करण्यात आली. जया वर्मा सिन्हा उद्या 1 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या नवीन पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. सध्या सिन्हा रेल्वे बोर्ड सदस्य ( संचालन आणि व्यवसाय विकास ) या पदावर होत्या. त्यांनी रेल्वेत किमान 35 वर्षे सेवा बजावलेली आहे.
जया वर्मा सिन्हा यांनी अलाहाबाद युनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले आहे. त्या भारतीय रेल्वे सेवा 1988 बॅचच्या आयआरटीएस अधिकारी आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनिल कुमार लाहोटी यांचा कार्यकाल संपल्याने त्यांच्या जागेवर सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विजयलक्ष्मी विश्वनाथन रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सदस्य होत्या तर जया वर्मा-सिन्हा रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून उद्या पदभार स्वीकारतील.
बालासोर अपघातानंतर कामगिरी
जया वर्मा सिन्हा या ओदिशाच्या बालासोर जिल्ह्यात झालेल्या कोरोमंडळ एक्सप्रेस दुर्घटनेच्या वेळी चर्चेत आल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली हे संवेदनशील प्रकरण हाताळण्यात आले. त्यांनी या प्रकरणाचे पीएमओ कार्यालयाला पॉवर पॉइंट प्रेजेंटेशन सादर केले होते. त्यांची सक्रीयता आणि कार्यशैलीला खूपच पसंत केले होते. आता सरकारने त्यांनाच रेल्वे बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्त केले आहे.
रेल्वेला सर्वाधिक निधी
रेल्वे बोर्डाला केंद्र सरकारकडून रेल्वे अर्थसंकल्प 2023-24 मध्ये रेकॉर्डब्रेक 2.4 लाख कोटीचा निधी मंजूर झाला आहे. या पार्श्वभूमीवर जया वर्मा-सिन्हा रेल्वे बोर्डाचा कार्यभार सांभाळणार आहेत. देशाच्या नॅशनल ट्रान्सपोर्ट असलेल्या रेल्वेला पहिल्यांदा इतका निधी मिळाला आहे.