ED कडून चौकशीची धास्ती, मुख्यमंत्री बेपत्ता, BMW कार जप्त, एअरपोर्टवर अलर्ट
ED Raid | ईडीकडून थेट एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे. यामुळे हे मुख्यमंत्री बेपत्ता झाले आहे. मुख्यमंत्री बेपत्ता झाल्यानंतर ईडीने त्यांची BMW कार जप्त केली आहे. एअरपोर्टवर अलर्ट दिला आहे.
नवी दिल्ली, दि.30 जानेवारी 2024 | अमलबजावणी संचालनालयकडून सध्या देशात विविध राजकीय नेते आणि काही उद्योगपतींची चौकशी सुरु आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरण, आर्थिक अनियमितता यामुळे ईडीच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. महाराष्ट्रात अनेक नेत्यांची चौकशी सुरु आहे. ईडी चौकशी झारखंडमधील मुख्यमंत्र्यांपर्यंत आली आहे. ईडीकडून त्यांच्यावर अटकेची कारवाई होण्याची भीती असल्यामुळे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन बेपत्ता झाले आहेत. ईडीने त्यांची BMW कार जप्त केली आहे. तसेच सोरेन त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी नसल्यामुळे विमानतळावर अलर्ट जारी केला आहे.
सोमवारी तीन ठिकाणी छापे
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे जमीन घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रींगमध्ये अडकले आहे. यामुळे ईडीकडून सोमवारी सोरेन यांच्या दिल्ली येथील शांती निकेतन येथील घरासह 3 ठिकाणी छापे मारले. सकाळी 7 वाजेपासून सुरु असलेली ही कारवाई रात्री उशीरापर्यंत सुरु होती. परंतु ईडीच्या टीमला सोरेन मिळाले नाही. यामुळे ईडीने त्यांची BMW जप्त केली. मुख्यमंत्री हेमंत सोरेन मिळत नसल्यामुळे ईडीने विमानतळावर अलर्ट जारी केला आहे.
झारखंडमध्ये हालचालींना वेग
दिल्लीत ईडीची कारवाई मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर सुरु असताना झारखंडमध्ये हालचालींना वेग आला आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार रांचीमध्ये दाखल होत आहे. काँग्रेस आमदार आणि मंत्री मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री बनवण्याची तयारी सुरु असल्याचा आरोप भाजप नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.
हेमंत सोरेन २७ जानेवारी रात्री दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी चार्टर फ्लाइटने उड्डाण केले होते. त्यानंतर काही राजकीय बैठका घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. परंतु दिल्लीत त्यांनी ईडी चौकशीबाबत कायदेशीर सल्लाही घेतला. त्यापूर्वी, ईडीने त्यांना दहावे समन्स पाठवले होते आणि 29 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान हजर राहण्यास सांगितले होते. जर तो ईडीसमोर हजर झाला नाही तर एजन्सी त्याच्या घरी जाऊन चौकशी करणार असल्याचे म्हटले आहे.