JNU Sedition case: 3 वर्षांनी आरोपपत्र दाखल
नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी अर्थात JNU मध्ये 3 वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी तीन वर्षांनी कोर्टात आरोपपत्र अर्थात चार्जशीट दाखल करण्यात आलं. विशेष चौकशी पथकाने याबाबत दिल्ली पोलीस आयुक्त आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत. या आरोपपत्रात विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि […]
नवी दिल्ली: दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटी अर्थात JNU मध्ये 3 वर्षांपूर्वी झालेल्या कथित देशविरोधी घोषणाबाजीप्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे. याप्रकरणी तीन वर्षांनी कोर्टात आरोपपत्र अर्थात चार्जशीट दाखल करण्यात आलं. विशेष चौकशी पथकाने याबाबत दिल्ली पोलीस आयुक्त आणि संबंधित यंत्रणांकडून आवश्यक त्या परवानग्या घेतल्या आहेत. या आरोपपत्रात विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांच्यासह 10 जणांची नावं आहेत. त्यांच्यावर देशद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
टाईम्सच्या वृत्तानुसार अन्य विद्यार्थ्यांमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये आकिब हुसेन, मुजीब हुसेन, मुनीब हुसेन, उमर गुल, रईस रसूल, बशरत अली, आणि खलिद बशीर भट यांचा समावेश आहे. आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं.
कालच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने तपासणी पूर्ण केली असून, पूर्ण रिपोर्ट दिल्ली पोलीस आयुक्तांना सादर केला. आज हा अहवाल कोर्टात सादर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.
9 फेब्रुवारी 2016 रोजी कन्हैया कुमारच्या नेतृत्त्वात जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा दिल्याचा आरोप आहे. जेएनयू कॅम्पसमध्ये विनापरवाना कार्यक्रम घेऊन देशविरोधी घोषणाबाजी झाल्याचा आरोप आहे.
काय आहे संपूर्ण घटनाक्रम?
1) 9 फेब्रुवारी 2016 रोजी दिल्लीतील जेएनयूमध्ये संसद हल्ल्याचा दोषी अफजल गुरु आणि मकबूल भट्ट यांची फाशी म्हणजे कायदेशीर हत्या असल्याचा दावा करत, एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. साबरमती धाब्याजवळ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ‘द कंट्री विदाऊट पोस्ट ऑफिस’ असं या कार्यक्रमाचं नाव ठेवण्यात आलं होतं. याच कार्यक्रमात भारत तेरे तुकडे होंगे, तुम कितने अफजल मारोगे, हर घर से अफजल निकलेगा, भारत की बर्बादी तक अशा घोषणा झाल्याचा आरोप आहे.
2) या घोषणाबाजीला भाजपप्रणित अभाविप या विद्यार्थी संघटनेने आक्षेप घेतला. त्यामुळे दोन्ही विद्यार्थी संघटनांमध्ये राडेबाजी झाली. हा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आणि हा व्हिडीओ मीडियापर्यंत पोहोचला.
3) 11 फेब्रुवारीला पूर्व दिल्लीचे खासदार महेश गिरी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला.
4) पोलिसांनी कन्हैया कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य यांची चौकशी केली
5) 12 फेब्रुवारीला जेएनयू छात्रसंघाचा अध्यक्ष कन्हैया कुमारला पोलिसांनी अटक केली. त्यावेळी उमर खालिद आणि अन्य विद्यार्थी गायब झाले.
6) 15 फेब्रुवारीला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करताना, वकिलांनी कन्हैया कुमार आणि काही पत्रकारांना मारहाण केली.
7) 21 फेब्रुवारीला सर्व फरार विद्यार्थी जेएनयूमध्ये पोहोचले.
8) 24 फेब्रुवारी 2016 रोजी पोलिसांनी अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांना अटक केली.
9) 19 मार्च 2016 रोजी तीनही विद्यार्थी कन्हैया कुमार, अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांना जामीन मिळाला.
10) 26 एप्रिल 2016 रोजी जेएनयूच्या चौकशी समितीने 21 विद्यार्थ्यांना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी धरलं. त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईचा इशारा दिला. त्याला डाव्या विद्यार्थी संघटनांनी विरोध केला.
11) 10 आणि 12 मे रोजी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाविरोधात दिल्ली हायकोर्टात धाव घेतली.
12) 13 मे रोजी हायकोर्टाने विद्यार्थ्यांवरील कारवाईला स्टे लगावला.