घरांना भेगा, भेगांमधून पाणी, रस्त्यांपाठोपाठ गावातील माणसांची मनं खचली, जोशीमठला भेगा कशामुळे पडल्या?
गेल्या आठवडाभरापासून देशात एका गावाची सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे उत्तराखंडमधलं जोशीमठ. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या गावात अचानक भेगा पडू लागल्या आहेत.
देहरादून (उत्तराखंड) : गेल्या आठवडाभरापासून देशात एका गावाची सर्वाधिक चर्चा आहे ते म्हणजे उत्तराखंडमधलं जोशीमठ. हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेल्या या गावात अचानक भेगा पडू लागल्या आहेत. घरांना तडे जाऊ लागले आहेत. घरांना पडलेल्या भेगांमधून पाणी बाहेर येऊ लागलं आहे. जोशीमठवर ही परिस्थिती कशामुळं उद्भवलीय? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. खरंतर घरांना पडलेल्या भेगा, रस्त्यांना पडलेल्या भेगा, घरांच्या भेगांमधून वाहणारं पाणी, आणि कुठल्याही क्षणाला कोसळू शकतील अशी घरं, अशी परिस्थिती उत्तराखंडमधील जोशीमठमध्ये आहे. ना भूकंप..ना महापूर..ना कुठली नैसर्गिक आपत्ती, तरीही जोशीमठमधली घरं खचू लागली आहेत. नागरिकांना प्रशासनानं घरं सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. जोशीमठमधली दोन हॉटेल्स पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हॉटेल्स पाडताना त्याच्या आजूबाजूला असलेली घरेही पाडावी लागणार आहेत. पण जोशीमठमधल्या घरांना आणि रस्त्यांना अचानक भेगा कशामुळं पडल्या? स्थानिकांना घरं सोडून जाण्यास कशामुळं भाग पडलं? यामगील कारण जाणून घेणंही महत्त्वाचं आहे.
एनटीपीसीकडून तपोवन विष्णूगाड हायड्रो पॉवर प्रोजेक्टची निर्मिती सुरु आहे. एनटीपीसीकडून सुरू असलेल्या या जलविद्युत प्रकल्पाच्या कामामुळेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
हिमालयाच्या पर्वतरांगांमधून 12 किलोमीटर लांब बोगदा तयार करण्यात येतोय. पर्वतरांगांच्या एका बाजूला 2 किलोमीटर तर दुसऱ्या बाजूला 6 किलोमीटरचं काम पूर्ण झालंय. मधल्या 4 किलोमीटरच्या बोगद्याचं काम अजूनही सुरु आहे.
ज्या ठिकाणी बोगदा तयार करण्यात येतोय. त्याच्या अगदी जवळच जोशीमठ हे गाव आहे. काही दिवसांपूर्वी बोगद्याच्या कामावेळी एनटीपीसीनं एक स्फोट घडवून आणल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
स्थानिकांनी केलेले हे आरोप एनटीपीसीनं मात्र फेटाळले आहेत. इथल्या पर्वतरांगांमध्ये कुठलाही स्फोट घडवून आणला नसल्याचं एनटीपीसीचं म्हणणं आहे.
एका अभ्यासानुसार जोशीमठमधला 99 टक्के भाग हा भूस्खलनग्रस्त आहे. 39 टक्के भागाला उच्च जोखमीचा, 28 टक्के भाग सुधारित जोखमीचा, 29 टक्के भाग कमी जोखमीचा म्हणून निश्चित करण्यात आला होता.
काही तज्ज्ञांच्या मते सरकारच्या दुर्लक्षामुळंच जोशीमठवर ही परिस्थिती उद्भवली आहे. 2013 मध्ये झालेल्या प्रलयानंतरही सरकारनं काहीही उपाययोजना केल्या नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
ज्या घरात आयुष्य काढलं, ज्या घरात मुलं लहानाची मोठी झालं, ती घरं आता स्थानिकांना सोडून जावं लागलंय. स्थानिकांसमोर आता पुनर्वसनाचा प्रश्न आहेच. पण गाव सोडून जावं लागण्याचं दु:ख त्यापेक्षा मोठं आहे.