नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपासून विरोधक जंग जंग पछाडत आहेत. मात्र विरोधकांना त्यात अजून यश आलेलं नाही. प्रत्येक निवडणुकीपूर्वी विरोधक भाजपला पराभूत करण्यासाठी एकजुटीचं आवाहन करतात. पण त्यात त्यांना फारसं यश येताना दिसत नाही. मात्र, आता मोदी आणि भाजपला सत्तेतून पायउतार करण्यासाठी खुद्द देशातील सर्वात मोठे वकील, खासदार कपिल सिब्बल मैदानात उतरणार आहेत. विरोधकांनी मला साथ द्यावी. आपण भाजप विरोधात भक्कम आघाडी उभी करू, असं आवाहन कपिल सिब्बल यांनी केलं आहे. कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व विरोधकांना एका मंचावर येण्याचं आवाहन केलं आहे.
आता लोकांना जागृत करण्याची वेळ आली आहे. अन्यायाच्या विरोधात आता लढण्याची गरज आहे. देशातील विरोधी पक्षांचे मुख्यमंत्री, नेत्यांनी मला साथ द्यावी. आपण एक राष्ट्रीय मोहीम सुरू करू. गुलामी संपुष्टात यावी यासाठी ही चळवळ असेल. येत्या 11 मार्च रोजी नवी दिल्लीच्या जंतरमंतरवर मोठा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाला देशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित केलं जाईल, असं कपिल सिब्बल यांनी सांगितलं. सरकार विरोधात आवाज उठवला तर कारवाई होते. सरकार विरोधात बोलणाऱ्यांना तुरुंगात टाकलं जात आहे. देश संविधानावर न चालता धर्मावर चालला आहे. त्यामुळेच आता जनतेला जागृत करणअयाची गरज आहे, असं ते म्हणाले.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काही कामांची स्तुतीही केली. मोदी सर्वच कामे चुकीची करत नाहीयेत. डिजिटलायझेशन, आवास योजना चांगल्या आहेत. मात्र, अन्याय होत असेल तर त्याविरोधात लढण्याची गरज आहे, असं सांगतानाच आपण राजकीय पक्ष स्थापन करत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. देश लोकांसाठी आहे. मला वाटतं मोदीही याला विरोध करणार नाहीत, असं त्यांनी सांगितलं.
येत्या 11 मार्च रोजी आम्ही आमचा अजेंडा लोकांसमोर मांडू. आम्ही मोदींना विरोध करत नाहीये. तर मोदींना सुधारणार आहोत, असा टोला त्यांनी लगावला. यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचं कौतुक केलं. समाजातील वेगवेगळया घटकांना एकत्र आणण्यात राहुल गांधी यशस्वी होत आहेत. देशात एकता किती महत्त्वाची आहे. याची त्यांनी जाणीव करून दिली आहे, असंही ते म्हणाले. सिब्बल यांनी गेल्यावर्षीच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. समाजवादी पार्टीने त्यांना राज्यसभेवर पाठवलं होतं.