कर्नाटक निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपची मोठी तयारी, मोदींच्या पाच सभा
राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील.
बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (karnataka assembly election) घोषणा अजून झालेली नाही. परंतु भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांपासून पक्षाचे अनेक प्रमुख नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकात येणार आहे. १ मार्चपासून भाजपकडून चार विजय संकल्प रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील.
भाजपचे दक्षिणेतील राजकीय प्रवेशद्वार असलेल्या कर्नाटकाला राजकीय महत्त्व आहे. दक्षिण भारतातील हे एकमेव राज्य आहे जिथे भाजप मजबूत सत्तेत आहे. या परिस्थितीत कर्नाटकातील सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपकडून सर्व शक्ती पणाला लावली जाणार आहे. मार्च महिन्यात राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यापुर्वीच भाजपने प्रचाराला जोर लावला आहे.
मोदींच्या सभांचा धडका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात चार ते पाच सभा होऊ शकतात. 27 फेब्रुवारी रोजी माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या वाढदिवसानिमित्त शिमोगा येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी मोदी उपस्थित राहणार आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात पंतप्रधान म्हैसूर-बेंगळुरू एक्स्प्रेस वेचे उद्घाटन करणार आहे. १ मार्चपासून भाजप कर्नाटकात चार विजय संकल्प रथयात्रा काढणार आहे. त्यांच्या समारोपाच्या दिवशी मोदी मध्य कर्नाटकातील दावणगेरे येथे जाहीर सभेलाही संबोधित करतील.
जनसंपर्क अभियान
गेल्या एक वर्षापासून भाजप कर्नाटकात सातत्याने विविध जनसंपर्क कार्यक्रम राबवत आहे. आता निवडणुकीपूर्वी राज्यभरातून चारही दिशांनी विजय संकल्प रथयात्रा काढून संपूर्ण राज्याला पिंजून काढणार आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा 1 मार्चपासून चामराज नगरजवळील मलाई महाडेश्वर टेकडीवरून सुरू होणाऱ्या विजय संकल्प रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवतील.
नड्डा चामराज नगरमध्ये मोठ्या सभेला संबोधित करणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 2 मार्च रोजी पश्चिम कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील नंदागड येथून दुसऱ्या विजय संकल्प रथयात्रेला सुरुवात करणार आहेत. तिसऱ्या रथयात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 मार्च रोजी बेंगळुरू येथून हिरवा झेंडा दाखवतील, तर चौथी रथयात्रा बिदरमधील बसवा कल्याण येथूनही निघेल
पाच समित्यांची निर्मिती
कार्यकर्त्यांना पूर्णपणे सक्रिय करण्यासाठी भाजपने पाच समित्याही स्थापन केल्या आहेत. या सर्व समित्यांच्या निमंत्रकांना 20 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत कर्नाटकातील सर्व 224 विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे पुत्र बी.वाय.विजयेंद्र यांच्यावर सर्व आघाड्यांची बैठक घेऊन त्यांना निवडणुकीच्या कामात लावण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.