बंगळुरू : कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाचा पेच अजूनही सुटलेला नाही. काँग्रेस नेते डीके शिवकुमार आणि सिद्धारमैया या दोन्ही नेत्यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला आहे. दोघेही आपल्या मागणीवरून मागे हटायला तयार नाहीत. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे. त्यातच आता दोन नेत्यांनीही मुख्यमंत्रीपदाचा दावा ठोकला आहे. एका आमदाराने तर माझ्याकडे 50 आमदारांचं बळ असल्याचं सांगून अप्रत्यक्षपणे हायकमांडला इशाराच दिला आहे. एवढेच नव्हे तर या आमदाराने यापूर्वी उपमुख्यमंत्रीपदही भूषविलेलं आहे. त्यामुळे दोन नेत्यांचं टेन्शन असताना आता त्यात आणखी दोघांची भर पडल्याने हायकमांडच्या टेन्शनमध्ये अधिकच भर पडली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार डीके शिवकुमार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना स्पष्ट शब्दात आपला इरादा कळवला आहे. एक तर मला मुख्यमंत्री करा. नाही तर मी आमदार म्हणूनच राहीन. मला उपमुख्यमंत्री करायची गरज नाही. मंत्रीही बनण्याची इच्छा नाही, असं शिवकुमार यांनी खरगे यांना कळवल्याचं समजतं. डीके शिवकुमार यांचा हा पक्षासाठीचा निर्वाणीचा इशारा असल्याचंही बोललं जात आहे. त्यामुळे पक्षाच्या अडचणी वाढल्या आहेत. मुख्यमंत्रीपदाचा पेच असतानाच आता पक्षातील अनेक नेत्यांनी उपमुख्यमंत्रीपदावरही दावा सांगितला आहे. त्यामुळे डोकेदुखी आणखी वाढली आहे.
कर्नाटकातील दलित नेते जी परमेश्वर यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितला आहे. परमेश्वर हे कर्नाटकात उपमुख्यमंत्री होते. तसेच 2010 ते 108 या काळात पक्षाचे कर्नाटक प्रदेशाध्यक्षही राहिले होते. 2013मध्ये काँग्रेसचं सरकार आलं होतं. तेव्हाही ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. मात्र, सिद्धारमैया यांच्या पुढे ते मागे पडले. आता मात्र, त्यांनी पुन्हा एकदा आपला दावा सांगितला आहे. मी शांत आहे, याचा अर्थ मी रेसमध्ये नाही असं होत नाही. मनात आणलं तर मी हंगामा करू शकतो. माझ्यासोबत 50 आमदार आहेत. मात्र, पदासाठी पुढे पुढे करणं योग्य नाही, असं परमेश्वर यांनी सांगितलं.
मी आठ वर्ष प्रदेशाध्यक्ष होतो. अध्यक्ष म्हणून मी प्रचंड मेहनत घेतली. पार्टीला सत्तेत आणलं. मी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं. मुख्यमंत्रीपदाची मी मागणी करत नाही. पण याचा अर्थ मी सक्षम नाही असा होत नाही. मुख्यमंत्रीपदाची मला ऑफर आली तर मी नकार देईन असं मी कधीच म्हटलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
जी परमेश्वर यांनी मुख्यमंत्रीपदासाठी आपला दावा सांगितलेला असतानाच बेलगावी उत्तरचे आमदार आसिफ सैत यांनी सतीश जारकीहोली यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी सूचवलं आहे. जारकीहोली राज्य काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्षही होते. जारकीहोली उत्तर कर्नाटकातील नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे. तर वरिष्ठ नेते जमीर अहमद खान यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं पाहिजे, असं सैत म्हणाले. मी हायकमांडला पत्र लिहिलं आहे. जर पत्राचं उत्तर मिळालं नाही तर पक्षातील एका गटाच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही सैत यांनी दिला आहे.