कर्नाटकात विधानसभेपूर्वी भाजपचे मुस्लिम मतांवर लक्ष, काय आहे रणनिती
भारतातील मुस्लिमांचे स्थूलमानाने तीन सामाजिक गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिल्या गटात धार्मिक नेते आणि उच्चभ्रू येतात. दुसऱ्या गटात मागास मुस्लिम येतात. तर एक गट दलित मुस्लिमांचा आहे.
बंगळुरु : कर्नाटकमध्ये काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका (karnataka assembly election) होणार आहेत. राज्यातील सत्ताधारी भाजप पुन्हा एकदा पुनरागमन करण्याच्या प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस आणि जेडीएस सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे हिंदूवादी पक्ष अशी प्रतिमा असलेला भाजप कर्नाटकात मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी भाजप रणनिती तयार केली आहे. कर्नाटकात हिंदू राजकारणासोबतच मुस्लिम समाजाचे राजकारण महत्त्वाचे आहे. यामुळे कर्नाटकातील मुस्लिमांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप प्रयत्न करत आहे. राज्यात सत्ता आणण्यात लिंगायत समाज महत्वाचा आहे. हा समाज भाजपसोबत आहे, तर वोक्कालिगांना जेडीएसचा पाठिंबा आहे.
भारतातील मुस्लिमांचे स्थूलमानाने तीन सामाजिक गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. पहिल्या गटात धार्मिक नेते आणि उच्चभ्रू येतात. दुसऱ्या गटात मागास मुस्लिम येतात. तर एक गट दलित मुस्लिमांचा आहे. भाजपची तयारी सुरु असताना कर्नाटकात काँग्रेसच्या गटात अजून हालचाली सुरु झाल्या नाहीत.
काय आहे भाजपची रणनीती
भाजपने निवडणुकीपूर्वी कर्नाटकातील मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. या अंतर्गत भाजपचे राज्यसभा खासदार लहारसिंग सिरोया यांनी जानेवारीत कर्नाटकचे अमीर-ए-शरियत मौलाना सगीर अहमद खान रुश्दी यांची भेट घेतली. यावेळी घेतलेल्या मेजवानीच्या कार्यक्रमात मुस्लिम धर्मांमधील अनेक जण सहभागी झाले. जानेवारी 2022 मध्ये आणि त्याआधी नोव्हेंबर 2022 मध्ये लहरसिंग सिरोया यांनी शिवाजीनगर आणि चामराजपेट विधानसभा मतदारसंघात आरोग्य शिबिरे आयोजित केली ज्यात मुस्लिम मतदारांची संख्या चांगली आहे. चिकपेट येथील भाजप आमदार उदय बी गरुडाचर यांनी चामराजपेठ येथील हजरत सय्यद सफदर अली शाह कादरी दर्ग्याला भेट देऊन चादर चढवली.
विधान परिषदेवर दोघांना पाठवले
गुजरातप्रमाणेच कर्नाटकातही भाजपने विधानसभा निवडणुकीत मुस्लिमांना तिकीट देण्याचा विचार केला नाही. मात्र, पक्षाने मुमताज अली खान आणि माजी पोलीस अधिकारी अब्दुल अझीम यांना विधान परिषदेवर उमेदवारी दिली.
मोदी यांच्या सभा
कर्नाटक विधानसभा निवडणुकीची (karnataka assembly election) घोषणा अजून झालेली नाही. परंतु भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांपासून पक्षाचे अनेक प्रमुख नेते व केंद्रीय मंत्री कर्नाटकात येणार आहे. १ मार्चपासून भाजपकडून चार विजय संकल्प रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्याच्या चारही दिशांमधून काढण्यात येणाऱ्या या रथयात्रेत पक्षाध्यक्ष जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सहभागी होणार आहे. ते वेगवेगळ्या ठिकाणांहून या रथयात्रांना हिरवा झेंडा दाखवतील.