बेंगळुरू: कर्नाटक आणि महाराष्ट्रा दरम्यान सीमावाद सुरू असतानाच कर्नाटक सरकारने एक फतवा काढला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील कोणत्याही मंत्र्यांना बेळगावात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. कर्नाटक सरकारच्या या अजब फतव्यामुळे सीमावादाचा प्रश्न आणखीनच चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असं पत्रं कर्नाटक सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवलं आहे. कर्नाटक सरकारच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना हे पत्रं पाठवलं आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सरकारने सीमावादावर तोडगा काढण्यासाठी समन्वय समिती स्थापन केली आहे. या समन्वय समितीत चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई आहेत. हे दोन्ही मंत्री डिसेंबर 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार होते. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने हे पत्रं पाठवलं आहे.
दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी आपण कर्नाटकात जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कोणताही फॅक्स मिळाला नाही. मी 3 तारखेला जाणार होतो. पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने कर्नाटकात कार्यक्रम असतात.
त्यामुळे कर्नाटकातील लोकांनी विनंती केली की तुम्ही 6 डिसेंबरला यावं. 3 आणि 6 दोन्ही दिवशी जाणं शक्य होणार नाही. त्यामुळे मी 6 डिसेंबर रोजी कर्नाटकात जाणार आहे. तिथे आंबेडकरवाद्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
काय सोयी सुविधा देऊ शकतो. त्यासाठी मी जाणार आहे. त्यांच्यासाठी निर्णय घ्यायला जाणार आहे. आम्ही लोकांशी चर्चा करायला जाणार आहोत. चिथावणी द्यायला जाणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.