माजी पंतप्रधानाच्या नातवाला मोठा धक्का, खासदारकी रद्द; काय आहे प्रकरण?
बंगळुरू उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे माजी पंतप्रधानाच्या नातवाची खासदारकी धोक्यात आली आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवी दिल्ली | 2 सप्टेंबर 2023 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची एका प्रकरणात खासदारकी रद्द झाली होती. त्यामुळे देशभरात वादळ निर्माण झाले होते. सूरतच्या न्यायालयाच्या विरोधात राहुल गांधी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी सुनावणी करत राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केली होती. त्यामुळे राहुल गांधी यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, आता अजून एका माजी पंतप्रधानाच्या घरातील व्यक्तीला मोठा फटका बसला आहे. एका माजी पंतप्रधानाच्या नातवाची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. माजी पंतप्रधानाच्या या नातवाची निवडणूकच कोर्टाने अमान्य केली आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवन्ना यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. कोर्टाने प्रज्वल यांची निवडणूक अमान्य केली आहे. प्रज्वल हे जनता दल सेक्यूलरचे हसन लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांची खासदारकी अमान्य केली आहे. जस्टिस के. नटराजन यांनी एक मतदार जी देवराज गौडा आणि भाजपचे लोकसभेचे पराभूत उमेदवार ए. मंजू यांच्या दोन्ही याचिका दाखल करून घेत त्यांना आंशिक मंजुरी दिली आहे. तसेच निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या नियमानुसार रेवन्ना यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
एकमेव खासदार
प्रज्वल रेवन्ना हे माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू आहेत. 2019च्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेले प्रज्वल हे जनता दल सेक्यूलरचे एकमेव खासदार आहेत. त्यामुळे आता जनता दल सेक्यूलरची एकुलती एक खासदारकीही धोक्यात आली आहे.
याचिका करणारी व्यक्तीच…
दरम्यान, मंजू यांनी भाजपच्या तिकीटावर प्रज्वल यांच्या विरोधात निवडणूक लढवली. त्यांना पराभवाचा सामनाही करावा लागला. त्यानंतर त्यांनी याचिका दाखल करत प्रज्वल यांच्या निवडीवर आक्षेप घेतला. मात्र, कालांतराने मंजू यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत जनता दल सेक्यूलरमध्ये प्रवेश केला आहे. निवडणूक काळात प्रज्वल यांन गैरप्रकार केला. त्यांनी निवडणूक आयोगाकडे कोणतीही संपत्ती जाहीर केली नाही, असा दावा या याचिकेत मंजू यांनी केला होता. त्यानंतर मुख्य न्यायामूर्ती के. नटराजन यांनी शुक्रवारी या प्रकरणी निर्णय दिला.
भाऊ आणि वडिलांवर कारवाईचे आदेश
दरम्यान, कोर्टाने मंजू यांना विजयी उमेदवार घोषित करण्यास नकार दिला आहे. स्वत: मंजू हे भ्रष्टाचारात अडकलेले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची विजयी घोषित करण्याची मागणी फेटाळून लावत आहोत, असं कोर्टाने म्हटलं आहे. तसेच प्रज्वल यांचे वडील आणि माजी मंत्री एचडी रेवन्ना तसेच प्रज्वल यांचे भाऊ सूरज रेवन्ना यांच्याविरोधात कारवाई करण्याचे निर्देशही कोर्टाने निवडणूक आयोगाला दिले आहेत.