Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मंत्रीही सेफ नाही? भरधाव ट्रकने केंद्रीय मंत्र्याच्या कारला उडवले, कारचा चक्काचूर; केंद्रीय मंत्री अपघातात जखमी

केंद्रीय राज्यमंत्री निरंजन ज्योती या कर्नाटकात अपघातात जखमी झाल्या आहेत. एक भरधाव ट्रकने त्यांच्या कारला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. त्या कर्नाटकात महिला संमेलनासाठी आल्या होत्या.

मंत्रीही सेफ नाही? भरधाव ट्रकने केंद्रीय मंत्र्याच्या कारला उडवले, कारचा चक्काचूर; केंद्रीय मंत्री अपघातात जखमी
sadhvi niranjan jyotiImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 17, 2023 | 8:09 AM

विजयपुरा : कर्नाटकाच्या विजयपुरा येथे काल रात्री भीषण अपघात झाला. केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती या कारने जात असताना मागून प्रचंड वेगाने आलेल्या ट्रकने साध्वी निरंजन ज्योती यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी प्रचंड होती की या अपघातात ट्रकच पलटी झाला. अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात साध्वी निरंजन ज्योती यांना आणि त्यांच्या चालकाला मार लागला आहे. मात्र, सुदैवाने दोघेही अपघातात बचावले आहेत.

विजयपुरा येथील नॅशनल हायवे -50 वर काल रात्री हा अपघात झाला. साध्वी निरंजन ज्योती इनोव्हा कारमधून जात होत्या. इतक्यात लोखंड्या सळ्यांनी भरलेल्या एका ट्रकने या कारला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ट्रकच पलटी झाला. निरंजन ज्योती यांच्या कारचे बोनेटचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, निरंजन ज्योती आणि त्यांच्या चालकाला मार लागला आहे. दोघांवरही स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा

सुदैवाने बचावलो

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ट्रक चालकाला ताब्यात घेतलं आहे. ट्रक चालक दारू पिऊन ट्रक चालवत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कर्नाटकात भाजपने महिला संमेलनाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी साध्वी निरंजन ज्योती आल्या होत्या. त्यावेळी हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. देवाच्या कृपेने मी सुरक्षित आहे. चालकाच्या सतर्कतेमुळे आमची कार ट्रक खाली आली नाही. मात्र, आम्हाला किरकोळ मार लागला आहे, असं निरंजन ज्योती म्हणाल्या.

कोण आहेत निरंजन ज्योती?

साध्वी निरंजन ज्योती या उत्तर प्रदेशातील फतेहपूर लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत. त्या पहिल्यांदाच खासदार बनल्या आहेत. पहिल्याच टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदाची लॉटरीही लागली आहे. मोदी सरकारमध्ये त्यांना फूड प्रोसेसिंग राज्य मंत्रीपद देण्यात आलेलं आहे. निरंजन ज्योती यांचा जन्म 1967मध्ये झाला आहे. हमीरपूर जिल्ह्याच्या पतिउरामध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांनी इयत्ता 12 पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. 21 व्या वर्षी त्यांनी स्वामी अच्युतानंद यांच्याकडून गुरुदीक्षा घेऊन संन्यास घेतला होता. त्यांनी विश्व हिंदू परिषदेत केंद्रीय सहमंत्री म्हणून काम पाहिलं आहे. त्या निषाद समुदायातून येतात. उत्तर प्रदेशातील भगवा ब्रिगेडच्या चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे.

निरंजन ज्योती यांनी आधी दुर्गा वाहिनी आणि नंतर विश्व हिंदू परिषदेत काम केलं. त्यानंतर त्या भाजपमध्ये आल्या. एक आक्रमक नेत्या म्हणून त्यांची प्रतिमा आहे. राम मंदिर आंदोलनामुळे राजकीय नेत्या म्हणून त्यांची ओळक निर्माण झाली. राम मंदिर आंदोलनानंतर त्या विश्व हिंदू परिषदेत आल्या. त्या भगवी वस्त्रे परिधान करतात आणि प्रवचनेही देतात. त्या अनेक धार्मिक संस्थांशी निगडीत आहेत.

बेताल विधान, मोदींची माफी

साध्वी निरंजन ज्योती या त्यांच्या बेताल विधानांमुळेही प्रसिद्ध आहेत. दिल्लीतील निवडणुकीपूर्वी त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं होतं. दिल्लीत एकतर रामजाद्यांचं (रामांच्या मुलांचं) सरकार बनेल किंवा हरामजाद्यांचं सरकार बनेल, असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं होतं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माफी मागावी लागली होती. अशा प्रकारची कठोर विधाने करू नका. मर्यादेचं पालन करा. देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करा, असं मोदी म्हणाले होते.