Ram Mandir | काश्मीरच्या मुस्लीम बांधवांनी रामलल्लांसाठी पाठवली ‘ही’ खास गोष्ट
अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य असं मंदिर साकारण्यात आलं आहे. या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकर्पण होत आहे. राम मंदिरासाठी जगभरातील रामभक्तांकडून वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जात आहे. विशेष म्हणजे काश्मीरच्या मुस्लीम नागरिकांनीदेखील राम मंदिराला स्पेशल गिफ्ट दिलं आहे.
अयोध्या | 20 जानेवारी 2024 : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्यदिव्य राम मंदिर उभारण्यात आलं आहे. रामलल्ला तब्बल 500 वर्षांनी भव्य अशा राम मंदिरात पुन्हा विराजमान होणार आहेत. येत्या 22 जानेवारीला रामलल्ला यांची मंदिरात प्राण प्रतिष्ठा होणार आहे. रामलल्ला यांची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात आणण्यात आली आहे. राममहोत्सावाला सुरुवात झाली आहे. संपूर्ण अयोध्यानगरी सजवण्यात आली आहे. देशातील आणि जगभरातील हजारो भाविक अयोध्येत दाखल होत आहेत. राम मंदिर लोकार्पणाचा दिवस हा अतिशय मोठा असणार आहे. या दिवसाची नोंद इतिहासात होणार आहे. त्यामुळे या ऐतिहासिक क्षणांना आणखी भव्यदिव्य करण्यासाठी प्रशासनाकडून अयोध्येत जय्यत तयारी केली जात आहेत. या कामात रामभक्तदेखील प्रशासनाला मदत करत आहेत. काही रामभक्तांकडून मंदिराच्या निर्माणासाठी पैसे भेट म्हणून देण्यात आले आहेत. भाविकांकडून राम मंदिरासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या जात आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी काश्मीरच्या मुस्लिम समाजाच्या बांधवांकडून विशेष केसर पाठवण्यात आलं आहे.
राम मंदिरासाठी देश-विदेशातून गिफ्ट दिले जात आहे. काश्मीरमधूनही मुस्लीम समाजाच्या नागरिकांनी रामलल्लाच्या सेवेसाठी विशेष ऑर्गेनिक केसर गिफ्ट केलं आहे. तसेच आफिगाणिस्तानच्या नदीचं पाणी रामलल्ला यांच्या अभिषेकासाठी पाठवण्यात आलं आहे. अयोध्येत विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष आलोक कुमार यांनी काश्मीर, तामिळनाडू येथून आलेले गिफ्ट्स यजनान डॉ. अनिल मिश्रा यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी आलोक कुमार यांनी प्रतिक्रिया दिली.
#WATCH | Ayodhya, UP: Vishwa Hindu Parishad President Alok Kumar hands over gifts received from Kashmir, Tamil Nadu, and Afghanistan to ‘Yajman’ of Shri Ram Temple Anil Mishra.
He says, “Muslim brothers and sisters from Kashmir came to meet me and expressed their happiness at… pic.twitter.com/g8Vywcde6J
— ANI (@ANI) January 20, 2024
“काश्मीर येथून काही मुस्लिम बांधव आले होते. त्यांनी खूप आनंद व्यक्त केला की, इथे राम मंदिर बनत आहे. आमचा धर्म वेगळा आहे. पण आपले सर्वांचे पूर्वज एकच आहेत. राम हे आमचे आदरणीय पूर्वज आहेत. त्यानंतर त्यांनी मला काश्मीरहून आणलेले दोन किलो केसर श्रीरामलल्ला यांच्या सेवेसाठी भेट म्हणून दिलं. या पूर्ण कार्यक्रमाचे मुख्य यजमान डॉ. अरविंद मिश्रा यांच्याकडे हे केसर सुपूर्द केलं जात आहे. तसेच तामिळनाडूच्या कापड निर्मात्यांनी श्रीराम मंदिराचं चित्र असलेली रेशीम चादर पाठवली आहे. तर अफगाणिस्तान येथून कुभा (काबुल) नदीचं पाणी श्रीरामांच्या अभिषेकासाठी पाठवण्यात आलं आहे”, असं आलोक कुमार यांनी सांगितलं.