Kashmir | काश्मिरच्या कुपवाडात उरले 350 पैकी फक्त 20 काश्मिरी पंडित! टार्गेट किलिंगचं लोकांमध्ये प्रचंड भय
कश्मीरमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. सततच्या हत्या बघता आता काश्मिरी पंडित कुटुंबांनी पुनर्वास वसाहती देखील सोडल्या आहेत. मात्र, सरकारने काश्मीरबाहेर स्थलांतरित करण्याच्या त्यांच्या मागणीला मान्यता दिली नाही. समाजकल्याण अधिकारी रंजन जोशी यांनी सांगितले की, 2010 पासून 96 काश्मिरी पंडित कुटुंबे अनंतनाग जिल्ह्यात राहत होती.
मुंबई : गेल्या बऱ्याच दिवसांपासून काश्मीरमध्ये (Kashmir) सातत्याने हिंदुंच्या हत्या केल्या जात आहेत. अतिरेकी दररोज काश्मिरी पंडित आणि हिंदू लोकांना टार्गेट करताना दिसतायेत. भरदिवसा गोळ्या घालून हत्या केल्यानंतर अतिरेकी पळून जात आहेत. अतिरेक्यांची मजल इतकी जास्त वाढली आहे की, थेट बँकेमध्ये जाऊन बँक मॅनेजर (Bank manager) विजय कुमार यांची हत्या केली. कुलगाममध्ये हा अतिशय धक्कादायक प्रकार घडला. सरकारी आणि खासगी क्षेत्रात काम करणारे काश्मिरी पंडित आणि हिंदू सध्या कश्मीरमध्ये सुरक्षित नाहीत. त्यामुळे आता कश्मीर सोडून जाण्याची वेळ येथील लोकांवर परत एकदा आलीये. प्रत्येकवेळी कश्मीरमधील हिंदूचा सुरक्षेचा (Security) प्रश्नांवर चर्चा केली जाते. मात्र, कश्मीरमध्ये होणाऱ्या हिंदुंच्या हत्येचा प्रश्न आजही कायमच आहे.
समाजकल्याण अधिकाऱ्यांनी सांगितली धक्कादायक माहिती
कश्मीरमध्ये राहणाऱ्या आणि काम करणाऱ्या हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. सततच्या हत्या बघता आता काश्मिरी पंडित कुटुंबांनी पुनर्वास वसाहती देखील सोडल्या आहेत. मात्र, सरकारने काश्मीरबाहेर स्थलांतरित करण्याच्या त्यांच्या मागणीला मान्यता दिली नाही. समाजकल्याण अधिकारी रंजन जोशी यांनी सांगितले की, 2010 पासून 96 काश्मिरी पंडित कुटुंबे अनंतनाग जिल्ह्यात राहत होती, परंतु अलिकडच्या काही महिन्यांत हत्या वाढल्याने केवळ आठच कुटुंबे कॅम्पमध्ये राहत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व कुटुंब आता जम्मूमध्ये स्थलांतरित झाली आहेत.
कश्मीरमध्ये 1 मे पासून ते आतापर्यंत 9 हत्यांची नोंद
जोशी पुढे बोलताना म्हणाले की, 1 मे पासून ते आतापर्यंत 9 हत्यांची नोंद करण्यात आलीये. यामध्ये बँक मॅनेजर विजय कुमार यांच्यासह शिक्षिका रजनी बाला यांचाही समावेश आहे. सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू काम करतात. यामुळे त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलाये. तसेच सरकारी कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांना बदलीचे आदेश देखील सरकारकडून मिळत नाहीत. कुपवाडा या सीमावर्ती जिल्ह्यातील हंदवाडा येथील नुथुसिया येथे राहणारे राकेश पंडित म्हणाले की, त्यांच्या छावणीत फक्त 20 काश्मिरी पंडित शिल्लक आहेत. अगोदर येथे नुथुसियामध्ये 350 लोक होते. मात्र, आता ते सर्वजण सोडून गेले आहे. कोणीही आपला जीव धोक्यात घालू इच्छित नाही. यासंदर्भत indiatimes ने सविस्तर रिपोर्ट दिला आहे.