मोदी यांच्याविरोधात विशेषाधिकार हनन नोटीस, काय आहे प्रकरण?; संसदेत नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहरू आडनावावरून केलेल्या विधानाचे आज संसदेत पडसाद उमटले. काँग्रेस खासदार केसी वेणूगोपाल यांनी तर मोदींच्या विरोधात विशेषाधिकार हननाची नोटीसच दिली.
नवी दिल्ली : संसदेत पहिल्यांदाच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विशेषाधिकार हननाचा प्रस्ताव आणला गेला. नेहरू आडनावाच्या मुद्द्यावरून मोदींनी टिप्पणी केली होती. त्याविरोधात राज्यसभेत काँग्रेसचे खासदार केसी वेणूगोपाल यांनी विशेषाधिकार हनन नोटीस दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात अवमानकारक भाषेचा प्रयोग केला आहे, असं नोटिशीत म्हटलं आहे. या नोटिशीला पंतप्रधान नरेंद्र मोदी कसं उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
केसी वेणूगोपाल यांनी या नोटीशीत नेमकं भाष्य केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली आहे. तसेच मोदी नेमकं काय म्हणाले होते, तेही या नोटिशीत नेमकेपणानं मांडलं आहे. मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की, आपल्याकडून नेहरूंच्या नावाचं कधी तरी विस्मरण होतं. जेव्हा नेहरूंच्या नावाचं विस्मरण होतं तेव्हा आपण त्यांना पुन्हा आठवतो. कारण ते देशाचे पहिले पंतप्रधान होते. पण मला हे कळत नाही की त्यांच्या पिढीतील कोणताही व्यक्ती नेहरू आडनाव लावायला का घाबरत आहे? त्यांना लाज वाटते का? नेहरू आडनाव ठेवण्यात लाज कसली आलीय? एवढा मोठा महान व्यक्ती तुम्हाला मान्य नाहीये का? कुटुंबाला मान्य नाहीये का?, असं मोदी म्हणाल्याचं या नोटिशीत नमूद करण्यात आलं आहे.
संसदेत गदारोळ
दरम्यान, संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात आज प्रचंड गदारोळ झाला. त्यामुळे आजही दोन्ही सभागृहात कामकाज होऊ शकलं नाही. आता सोमवारपर्यंत सभागृह स्थगित करण्यात आलं आहे. राहुल गांधी यांच्या केंब्रिज विद्यापीठातील विधानाचे दोन्ही सभागृहात पडसाद उमटले. संसदेत आप, बीआरएस आणि काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर केसी वेणूगोपाल यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात मोदींनी केलेल्या कथित अवमानकारक विधानाविरोधात विशेषाधिकार प्रस्ताव दाखल केला. याबाबत वेणूगोपाल यांनी राज्यसभेच्या अध्यक्षांना पत्रही पाठवलं आहे.
माईक बंद केल्याचा आरोप
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातही आज संसदेत प्रचंड गदारोळ झाला. आम्ही जेव्हा बोलायला उभं राहिलो तेव्हा आमचा माइक बंद करण्यात आला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. विरोधकांनी प्रचंड गदारोळ केल्याने कोणत्याही चर्चेशिवाय 15 मिनिटातच सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आलं. विरोधकांनी अदानी मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. त्यामुळे सत्ताधारी खासदारांनी विरोधकांना बोलू दिलं नाही. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. याच दरम्यान टीव्हीवरील लाइव्ह प्रक्षेपण म्यूट केलं गेलं. त्यानंतर विरोधकांनी संसदेच्या आवारातील गांधीजींच्या पुतळ्याजवळ येऊन धरणे आंदोलन केलं.