सर्वात मोठी बातमी ! किरेन रिजीजू यांना कायदा मंत्रीपदावरून तडकाफडकी हटवलं, मोदी सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: May 18, 2023 | 10:33 AM

देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत.

सर्वात मोठी बातमी ! किरेन रिजीजू यांना कायदा मंत्रीपदावरून तडकाफडकी हटवलं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
Follow us on

नवी दिल्ली : देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे. कायदा मंत्री किरेन रिजीजू यांना कायदे मंत्रीपदावरून हटवण्यात आलं आहे. त्यांच्याऐवजी अर्जुनराम मेघवाल हे नवे कायदा मंत्री म्हणून काम पाहणार आहेत. कायदेमंत्री म्हणून रिजीजू यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त ठरली होती. त्यामुळे त्यांना पदावरून हटवण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मोदी सरकारचा हा निर्णय किरेन रिजीजू यांच्यासाठी मोठा झटका असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच रिजीजू यांना तडकाफडकी पदावरून हटवण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंत्रिमंडळात फेरबदल करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे किरेन रिजीजू आता कायदा मंत्री राहणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्याकडे भू विज्ञान मंत्रालय देण्यात आलं आहे. तर अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे कायदा आणि न्याय मंत्रालय देण्यात आलं आहे. त्यांच्याकडे या खात्याचा स्वतंत्र प्रभार असणार आहे.

हे सुद्धा वाचा

म्हणून पद गेलं

किरेन रिजीजू हे कायदा मंत्री झाल्यापासून वादग्रस्त ठरले होते. त्यांची विधाने आणि निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे भाजपच्या इमेजला तडाही जात होता. सातत्याने वादात अडकल्यामुळे रिजीजू यांचं पद जाणार असल्याचा कयास वर्तवला जात होता. त्यानुसार आज तडकाफडकी त्यांच्याकडून कायदा मंत्रीपद काढून घेण्यात आलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं आहे.

कॉलेजियमला विरोध

किरेन रिजीजू यांनी वारंवार कॉलेजियमला विरोध केला होता. कॉलेजियम द्वारे न्यायाधीशांची नियुक्ती होऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं. तर सर्वोच्च न्यायालय कॉलेजियमच्या मुद्द्यावर अडून होते. अनेक देशात कॉलेजियमचीच पद्धत असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. त्यामुळे पहिल्यांदा कायदा मंत्री आणि सर्वोच्च न्यायालय आमनेसामने आलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयातील न्यायाधीशाची नियुक्ती कॉलेजियमद्वारे केली होती. पण त्याला कायदा मंत्रालयाने मंजुरी दिली नव्हती.

कोण आहेत मेघवाल?

अर्जुन राम मेघवाल हे सध्या संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्री आहेत. त्यांच्याकडे आता कायदा आणि न्याय विभागाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. मेघवाल हे सेवानिवृत्त आयएएस अधिकारी होते. ते मूळचे राजस्थानचे आहेत. राजस्थानमधील एक मोठे नेते म्हणून ते परिचित आहेत. बिकानेर आणि फिलीपाईन्समधून त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी एमए, एलएलबी आणि एमबीएच्या पदव्या घेतलेल्या आहेत.