नवी दिल्ली: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) आणि भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यातील कलगीतुरा काही थांबताना दिसत नाही. हिसाब तो देना पडेगा, असं शिवसेना (shivsena) नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर त्याला किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राऊत आता थकले आहेत, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे. सोमय्यांवर महाराष्ट्र हसतोय या राऊत यांच्या विधानाची सोमय्या यांनी हसत हसतच खिल्ली उडवली आहे. महाराष्ट्र हसतोय…. हा हा हा… असं म्हणत सोमय्या यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनी 240 ट्विट केले. काही झालं नाही, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांनी यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. सोमय्या गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत आहेत. यावेळी त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्याचं सांगण्यात येतं.
किरीट सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंच्यावर जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे तुम्ही नवरदेव आहात ना? 19 बंगले घोटाळ्यांमध्ये बायकोची बाजू का घेतली नाही?, असा सवालही सोमय्या यांनी केला. आधी ठाकरे परिवार, सरकार, सकाळी पाया पडायचे. आता आदाब केला जातोय, अशी टीका करतानाच सोमय्या यांनी वाकून आदाबची अॅक्शनही करून दाखवली.
बात निकलेगी तो फिर
दूर तलक जायेगी.!
किरीट सोमय्या अँड फॅमिली ला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत ?
युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहारची चौकधी होईल!
ब्लॅकमेलर.. blackmailer जेल जायेंगे..
हीसाब तो देना पडेगा!
जय महाराष्ट्र!@CMOMaharashtra @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/E8vq3mx9RR— Sanjay Raut (@rautsanjay61) May 20, 2022
यावेळी त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही टीका केली. आता अनिल परब यांच्या रिसॉर्टला कुणीही वाचवू शकणार नाही. त्याबाबत केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ऑर्डर काढणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचा अयोध्या दौरा स्थगित केला आहे. त्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला. अयोध्या रामाची भूमी आहे. राम प्रत्येकाला आशीर्वाद देतो. राज ठाकरे यांनी त्यांचा दौरा स्थगित केला. यावर मी काही बोलणार नाही, असंही ते म्हणाले.
राऊत यांनी सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानच्या घोटाळ्याचं ट्विट केलं आहे. त्यासोबत धर्मदाय आयुक्तांकडे करण्यात आलेलं पत्रंही ट्विटमध्ये जोडण्यात आलं आहे. बात निकलेगी तो फिर दूर तलक जायेगी.! किरीट सोमय्या अँड फॅमिली ला कोट्यावधी रुपयांच्या देणग्या कोण देत आहेत? युवक प्रतिष्ठानच्या आर्थिक व्यवहारची चौकधी होईल! ब्लॅकमेलर.. blackmailer जेल जायेंगे.. हिसाब तो देना पडेगा!, असं ट्विट राऊत यांनी केलं होतं.