Chandrayaan4 : अमेरिका, रशिया, चीनला जे जमलं नाही, ते भारत मिशन चंद्रयान-4 मध्ये करणार, ISRO ची जिद्द
Isro Moon Mission : चंद्रयान-4 मिशन कसं असेल? ते कसं पूर्ण होणार? याबद्दल भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने माहीती दिलीय. लॉन्चिंगपासून चंद्रयान-4 चा प्रवास कसा असेल? त्या विषयी सांगितलं आहे. सप्टेंबर महिन्यात भारत सरकारने या मिशनला परवानगी दिली आहे. या मिशनसाठी किती हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. चंद्रयान-3 मिशनपेक्षा ही किती वेगळी मोहिम आहे, त्या बद्दल जाणून घ्या.
चंद्रयान-3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोकडून मिशन चंद्रयान-4 ची तयारी सुरु झाली आहे. भारताची ही चौथी चंद्र मोहीम असेल. आतापर्यंत अमेरिका, चीन आणि रशिया यांनी जे केलेलं नाही, ते भारत आपल्या चौथ्या चंद्र मोहिमेतून साध्य करण्याचा प्रयत्न करणार आहे. अमेरिकेच मिशन अपोलो, रशियाच लुना आणि चीनच चांग-ई या चंद्र मोहीमा झाल्या आहेत. भारताची चौथी चंद्र मोहिम ही एक रोबोटिक मिशन असेल. चंद्रयान-4 लॉन्चिंगपासून पृथ्वीवर परत येईपर्यंत काय-काय करणार आणि अन्य मून मिशनपेक्षा ही मोहीम वेगळी कशी असेल, त्याची माहिती इस्रोकडून देण्यात आली आहे.
इस्रोने चंद्रयान-3 ला दक्षिण ध्रुवावर उतरवलं. आतापर्यंत कुठल्याही देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवलेलं नाही. आता इस्रो चंद्रयान-4 च्या माध्यमातून हेच काम पुढे सुरु ठेवणार आहे. या मिशन अंतर्गत भारताच चंद्रयान-4 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. या भागात खड्डे आहेत. नमुने गोळा करण्याची इस्रोची योजना आहे. हे नमुने पुन्हा पृथ्वीवर परत आणण्यात येतील. हे यासाठी महत्त्वाच आहे, कारण हायड्रोजन, पाणी आणि बर्फासह बाष्पशील पदार्थाचे रेकॉर्ड मिळाले आहेत. अपोलो, लुना आणि चांग ई या मिशनमध्ये चंद्रावरुन नमुने गोळा करुन पृथ्वीवर आणले. पण ही स्पेसक्राफ्ट दक्षिण ध्रुवावर उतरली नव्हती. त्यामुळे तिथले नमुने अजून पृथ्वीवर आलेले नाहीत.
चंद्रयान-4 कधी लॉन्च होणार?
चंद्रयान-4 भारताचं चौथं मून मिशन आहे. चंद्रयान-3 मध्ये प्रज्ञान रोवरमधून मिळालेल्या माहितीच्या आधारावर चौथ्या मून मिशनची आखणी करण्यात येणार आहे. चंद्रयान-4 मध्ये स्पेसक्राफ्ट दक्षिण ध्रुवावर लँड झाल्यानंतर आसपासच्या एक किलोमीटरच्या परिसरातील नमुने गोळा करुन पृथ्वीवर आणेल. चंद्रयान-3 च्या तुलनेत हे मिशन खूप एडवान्स असेल. इस्रोच्या अवकाश अनुप्रयोग केंद्र म्हणजे एसएसीचे डायरेक्टर नीलेश देसाई यांच्यानुसार हे मिशन 2030 मध्ये लॉन्च होऊ शकतं. इस्रोकडून आधी 2028 पर्यंत हे मिशन लॉन्च होईल असा दावा करण्यात आला होता. सप्टेंबर महिन्यात शुक्र मिशनसोबत या मोहीमेला मंजुरी देण्यात आली आहे.
चंद्रयान-4 मध्य रोवरच वजन किती असेल?
चंद्रयान-4 सोबत जाणाऱ्या रोवरच वजन जवळपास 350 किलो असेल. चंद्रयान-3 सोबत गेलेल्या प्रज्ञान रोव्हरच वजन फक्त 30 किलो होतं. चंद्रयान-3 ने चंद्रावर 500 मीटरच अंतर कापलं होतं. लँडिंग स्थळापासून सर्व दिशांमध्ये एक किलोमीटरमध्ये फिरुन तिथून नमुने गोळा करुन पृथ्वीवर आणले होते.
चंद्रयान-4 मध्ये 5 मॉड्युल असतील
चंद्रयान-4 मध्ये 5 मॉड्युल असतील, जे वेगवेगळं काम करतील. यात प्रोपल्शन मॉड्युल, डिसेंडर मॉड्युल, एसेंडर मॉड्युल, ट्रांसफर मॉड्युल आणि री एंट्री मॉड्युल असेल. मागच्या मिशनमध्ये तीनच मॉड्युल होते. प्रोप्लशन, लँडर आणि रोवर. रॉकेटपासून वेगळं झाल्यानंतर प्रोप्लशनने रोव्हर आणि लँडरला चंद्राच्या कक्षेत सोडलं होतं. त्याच्या पुढचं काम विक्रम लँडरने केलेलं. प्रज्ञान रोव्हरच्या माध्यमातून चंद्रावरील रहस्य शोधण्याचा प्रयत्न झाला.