चंदीगड | 21 सप्टेंबर 2023 : खलिस्तानी समर्थक आणि गँगस्टर सुक्खा ऊर्फ सुखदूल दुनुके सिंग याची हत्या करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी कॅनडात त्याची गोळ्या घालून हत्या केली आहे. सुक्खा हा खलिस्तानी समर्थक होता. खलिस्तान्यांना आर्थिक रसद पोहोचवण्याचं काम तो करत होता. पण त्याचा कॅनडातच गेम वाजल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सुक्खाच्या हत्येची जबाबदारी भारतातील एका बड्या गँगने घेतली आहे. त्यामुळे आणखीनच खळबळ उडाली आहे.
लॉरेन्स बिश्नोई गँगने सुक्खाच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. फेसबुक पोस्ट करून ही जबाबदारी घेतली आहे. तसेच कॅनडातून पळून जा. नाही तर तुम्हाला तुमच्या पापांची शिक्षा मिळालीच म्हणून समजा, अशी धमकीही या फेसबुक पोस्टमधून देण्यात आली आहे.
हां जी. संत श्री अकाल. राम राम. हा सुक्खा दुनिके हा बंबिहा ग्रुपचा इंचार्ज बनून फिरत होता. कॅनडाच्या विनिपेग शहरात त्याचा खून झाला आहे. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई ग्रुप घेत आहे. या ड्रग्स एडिक्टेड नशेडीने केवळ नशा करण्यासाठी आणि पैशासाठी अनेकांची घरे उजाडली होती. आमचे बंधू गुरलाल बराड, विक्की मिद्दुखेडा यांच्या हत्येत त्याचा हात होता.
बाहेर राहून त्याने यांची हत्या केली. संदीप नंगल अंबियाची हत्याही त्यानेच केली होती. आता त्याला त्याच्या पापांशी शिक्षा मिळाली आहे. फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. एखाद दुसरे कोणी कॅनडात राहिले असतील तर त्यांनी जिथे वाटेल तिथे पळून जावं. जगातील कोणत्याही देशात पळून जा. आमच्याशी पंगा घेऊन तुम्ही वाचाल असा विचारही करू नका. वेळ कमी अधिक होईल. पण सर्वांना शिक्षा मिळेल, असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
सुक्खा हा पंजाबमधून फरार झालेला गँगस्टर होता. एनआयएच्या लिस्टमध्ये यादीत ए कॅटेगिरीतील गँगस्टरच्या यादीत त्याचं नाव होतं. त्याची आज कॅनडात गोळ्या घालून हत्या करण्यात आली. खलिस्तानी अतिरेकी अर्शदीप सिंग ऊर्फ अर्श डाला याचा तो उजवा हात होता.