लॉरेन्स बिश्नोई गँगचे पाकिस्तान कनेक्शन, टोळीत तब्बल इतके शुटर्स?
लॉरेन्स बिश्नोई गँगने सध्या देशात दहशत निर्माण केली आहे. या टोळाच्या गुंडांनी पुन्हा एकदा डोकं वर काढले आहे. लोकांमध्ये आता भीतीचे वातावरण आहे. या गँगने सलमान खानला देखील जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याआधी बाबा सिद्दिकी यांच्या हत्येने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ही गँग सध्या अनेक राज्यात सक्रीय असल्याचा दावा केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावरील हल्ल्याने मुंबई हादरली आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर सार्वजनिक ठिकाणीच गोळीबार झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली असली तरी पोलीस वेगवेगळ्या अँगलने याचा तपास करत आहेत. दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून एकाचा शोध सुरु आहे. बिश्नाई गँगने जो कोणी सलमान खानला मदत करेल त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असं देखील फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे. आधी सिद्धू मूसेवाला आणि आता बाबा सिद्दीकी, लॉरेन्स बिश्नोई टोळी आता गुन्हेगारी जगतात राजा बनण्याचा प्रयत्न करत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम सारखी दहशत पसरवण्याचा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा इरादा आहे. लॉरेन्स बिश्नोई त्याच मार्गावरुन जात असताना दिसत आहे.
एनआयएने लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्यासह 16 गुंडांविरुद्ध UAPA कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले आहे. एनआयएने आरोपपत्रात लॉरेन्स बिश्नोई टोळीची तुलना दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीशी केलीये. ज्या प्रकारे दाऊदने 90 च्या दशकात दहशत माजवण्याचा प्रयत् केला तसाच प्रयत्न बिश्नोई गँगकडून होत आहे. त्याने आता हळूहळू संपूर्ण देशात आपले नेटवर्क तयार केले आहे.
दाऊद इब्राहिम अंमली पदार्थांची तस्करी, हत्या, खंडणी असं रॅकेट चालवायचा. त्यानंतर त्याने पाकिस्तानी दहशतवाद्यांशी हातमिळवणी करून भारतात बॉम्ब हल्ले घडवून आणले. आता बिश्नोई टोळी देखील अशाच प्रकारे वाटचाल करत आहे. उत्तर भारतात बिश्नोई टोळीचे 700 हून अधिक शूटर असल्याचा दावा केला जात आहे.
लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख सतविंदर सिंग उर्फ गोल्डी ब्रार आहे, जो कॅनेडियन पोलीस आणि भारतासाठी वॉन्टेड गुन्हेगार आहे. एनआयएच्या आरोपपत्रात बिश्नोई टोळीत 700 हून अधिक शूटर असल्याचा दावा केला गेला आहे. त्यापैकी 300 एकट्या पंजाबशी संबंधित होते. बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांचे फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर पोस्ट करण्यात आली आहेत. 2020-21 पर्यंत, बिश्नोई टोळीने खंडणीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमावले होते आणि ते पैसे हवाला वाहिन्यांद्वारे परदेशात पाठवले गेले होते.
एनआयएच्या माहितीनुसार लॉरेन्स बिश्नोई टोळी आधी फक्त पंजाबपुरती मर्यादित होती, पण आता ते गोल्डी ब्रारच्या मदतीने हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमधील टोळ्यांशी हातमिळवणी करून मोठे नेटवर्क तयार केले. लॉरेन्स बिश्नोई टोळी आता पंजाब, उत्तर प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान आणि झारखंडसह उत्तर भारतात पसरली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना यात खेचले जात आहे.
पाकिस्तानशी कनेक्शन
ही टोळी तरुणांना कॅनडा किंवा त्यांच्या आवडीच्या कोणत्याही देशात नेण्याचे आमिष दाखवते. एनआयएच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानस्थित खलिस्तानी दहशतवादी हरविंदर सिंग रिंडा हा पंजाबमध्ये टार्गेट किलिंग आणि गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी बिश्नोई गँगच्या शूटर्सचा वापर करतो.