असा प्रचार कधीच कुणी केला नव्हता, भाजपचा हायटेक प्रचार; मिशन लोकसभेसाठी कॉल सेंटरच का?
लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सज्ज झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील हायटेक प्रचारावर चर्चा केली जाणार आहे.
नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्तेची हायट्रिक करण्यावर भाजपने भर दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने हायटेक प्रचार करण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा एक मेगा प्लानही भाजपने तयार केला आहे. भाजपचा आजवरच्या निवडणुकीतील हा सर्वात मोठा हायटेक प्लान असणार आहे. असा प्रचार कधीच कुणी केला नव्हता असा प्रचार भाजप करणार असून संपूर्ण देशातील वातावरण ढवळून काढणार आहे. त्यामुळे भाजपच्या या हायटेक प्रचाराकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
भाजपने थेट कॉल सेंटरमधून प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजप देशात मोठ्या प्रमाणावर कॉल सेंटर उघडणार आहे. या कॉल सेंटरमध्ये 20 हजार तरुणांची फौज तैनात करण्यात येणार आहे. ही फौज रात्र न् दिवस भाजपचा प्रचार करणार आहे. भाजपने लवकरच एका बैठकीचं आयोजन केलं असून त्यात या हायटेक प्रचारावर चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
225 हून अधिक कॉल सेंटर
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात 225 हून अधिक कॉल सेंटर उघडण्याचा निर्णय घेतला आहे. आज या कॉल सेंटरबाबत एक बैठक होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह या बैठकीला मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला भाजपच्या कॉल सेंटरचे देशभरातील संयोजक येणार आहेत. यावेळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि संघटन मंत्री बीएल संतोषही लोकसभा निवडणूक प्रचाराची रुपरेषा मांडणार आहे. ही बैठक म्हणजे भाजपच्या लोकसभा निवडणुकीची तयारी मानली जात आहे.
बंसल यांच्याकडे धुरा
भाजपचे राष्ट्रीय महासचिव सुनील बंसल यांच्याकडे देशभरातील कॉल सेंटरची धुरा देण्यात येणार आहे. जेपी नड्डा आणि बंसल यांची नुकतीच एक बैठक झाली. त्यात बंसल यांनी कॉल सेंटर उघडण्याची रुपरेषा मांडल्याचं सांगितलं जात आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत कॉल सेंटरचा किती प्रभाव पडू शकतो याची माहिती बंसल यांनी नड्डा यांना दिल्याचं सांगितलं जात आहे.
24 तास 20 हजार कॉलर्स
देशभरात हे कॉल सेंटर उघडले जाणार आहे. या कॉल सेंटरमध्ये 18 ते 20 हजार कॉलर्स काम करतील. हे कॉलर्स 24 तास काम करतील. त्यासाठी त्यांना सॉफ्टवेअर आणि टेक्निकल स्पोर्ट दिला जाणार आहे. 2019मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत देशभरात 190 कॉल सेंटर उघडले होते. त्यात 13 हजार कॉलर्स काम करत होते. आता भाजपने हा आकडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या कॉलर्सला भाजप ट्रेनिंगही देणार असल्याचं सांगितलं जात आहे.