भाजपची दक्षिण भारतात मोठी राजकीय खेळी, NDA ची ताकद वाढली
दक्षिण भारतातल्या दोन मोठ्या पक्षांची भाजपसोबत युती होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे. त्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात मोठा फायदा होणार आहे.
संदीप राजगोळर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 9 मार्च 2024 : देशाच्या राजकारणातील एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जिंकून येण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात आली आहे. या रणनीतीचा भाग म्हणून आता भाजप आता आपल्या जुन्या मित्रपक्षांना मैत्रीचा प्रस्ताव पाठवत आहे. भाजपच्या या रणनीतीला यश देखील येताना दिसत आहे. कारण दक्षिण भारतातल्या दोन मोठ्या पक्षांची भाजपसोबत युती होण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा होणार आहे. त्यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत दक्षिण भारतात मोठा फायदा होणार आहे. आंध्र प्रदेशमधील तेलगू देसम पार्टी, जनसेना पक्ष हे एनडीएत सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपला आंध्र प्रदेशात मोठा फायदा होणार आहे. दरम्यान, भाजपकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 197 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. ज्या राज्यांमध्ये भाजपची युती नाही त्या राज्यांचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. तर इतर राज्यांमध्ये मित्रपक्षांसोबत चर्चा करुन भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने आपल्या जुन्या मित्र पक्षांना पुन्हा एकदा सोबत घ्यायला सुरुवात केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची कालच तेलगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत भेट झाली. त्यानंतर चंद्राबाबू नायडू पुन्हा एनडीएमध्ये येणार असल्याच्या चर्चा होत्या. अखेर यावर तेलगू देसम पक्षाचे खासदार के. रवींद्र कुमार यांनी शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा आणखी एक जुना मित्रपक्ष सोबत येणार आहे.
‘अबकी बार 400 पार’, भाजपचा निर्धार
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारी यादी जाहीर करण्यात आघाडी घेतली. भाजपने येत्या निवडणुकीत स्वत:च्या पक्षाचे 370 आणि एनडीएचे 400 खासदार निवडून आणण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यामुळे भाजपकडून जुन्या मित्रपक्षांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील एनडीएमध्ये सहभागी होणं पसंत केलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि तेलगु देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांची गुरुवारी दिल्लीत बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहे. ‘अबकी बार 400 पार’ हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी भाजप जुन्या भिडूंना एनडीएमध्ये घेत आहे. येत्या 2 दिवसात तेलगु देसम पक्षाची भाजपसोबतच्या युतीची औपचारिक घोषणा होऊ शकते. यापूर्वी 2019 पर्यंत तेलगु देसम पक्ष एनडीएचा घटक पक्ष होता.