महाविकास आघाडीत जागा वाटपावर चर्चा कधी…उद्धव ठाकरे यांनी सांगितले 2029
uddhav thackeray and Sanjay Raut: अटलबिहारी वाजपेयी यांच्या वेळेस असणार भाजप वेगळी होती. आताची भाजप वेगळी आहे. आता भ्रष्ट असलेले सर्व लोक भाजपसोबत आले आहेत. भाजपने ज्या लोकांना ठग म्हटले आहे, ती सर्व त्यांच्या पक्षात गेली आहे. भाजपने अजित पवार, नवाव मलिक, प्रफुल्ल पटेल यांना ठग म्हटले होते.
शिवसेना ‘उबाठा’ पक्षाचे नेते उद्धव ठाकरे दिल्लीत पोहचले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ “इंडिया आघाडी”तर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला केला. तसेच महाविकास आघाडीत समन्वय नसल्याचा दावा खोडून काढला. आता जागा वाटपावर चर्चा कधी? या प्रश्नाचे उत्तर त्यांनी 2029 असे दिले.
महाविकास आघाडीत समन्वय?
महाविकास आघाडीत समन्वय नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर त्यांनी मग महायुतीत कुठे समन्वय आहे, असे उत्तर दिले. मग महायुतीत समन्वय नाही तर महाविकास आघाडीत समन्वय नको का? असे पुन्हा विचारले. तेव्हा बाजू सावरुन घेत त्यांनी आमच्यात समन्यव आहे. इतर उमेदवारांची नावे दोन-तीन दिवसांत जाहीर करणार आहोत. आता जागा वाटपावर थेट चर्चा 2029 मध्ये होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा खर्च मी करतो
राहुल गांधी यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट दाखवावा. त्यासाठी संपूर्ण चित्रपटगृह मी बुक करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सांगितले. त्या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांनी मणिपूर फाईल्स चित्रपट काढावा. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी लडाख, काश्मीरचा दौरा करावा. त्यासाठी लागणार सर्व खर्च मी करतो, असे उत्तर दिले.
ती भाजप वेगळी होती
अटलबिहारी वाजपेयी यांच्या वेळेस असणार भाजप वेगळी होती. आताची भाजप वेगळी आहे. आता भ्रष्ट असलेले सर्व लोक भाजपसोबत आले आहेत. भाजपने ज्या लोकांना ठग म्हटले आहे, ती सर्व त्यांच्या पक्षात गेली आहे. भाजपने अजित पवार, नवाव मलिक, प्रफुल्ल पटेल यांना ठग म्हटले होते. ते आता भाजपसोबत आहेत. आमच्यासोबत असलेली राष्ट्रवादी आता ठग मुक्त झाली आहे.